गेल्या दीड वर्षात ३ लाख तरूणांना रोजगार दिला – मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

0
2

मुंबई : प्रतिनिधी
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
कौशल्य, रोजगार विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांच्यासह ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज चाळीस हजार विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. नव्याने सुरू झालेल्या ७५ आभासी क्लासरूम आणि आज सुरू झालेल्या अभ्यासिका यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील, अशी मला आशा आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया व डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत.याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उद्योजकतेला लागणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन आयटीआयमध्ये विविध ९०० कोर्सेस शिकवले जातात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here