गरजू नागरिकांच्या लाभासाठी ‘शासन आपल्या दारी’

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी राज्य शासनातर्फे राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पाचोरा येथे घेण्यात आला. सुरुवातीला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार हे पाचोरा येथे दाखल झाल्यानंतर युवानेता सुमीत पाटील व सहकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत त्यांचे भव्य स्वागत केले. पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, ऑक्सिजन पार्क यासह विविध विकासकामांचेही भूमिपूजन, उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, ग्रामविकासमंत्री महाजन, मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.

याव्ोळी पाचोरा व भडगाव तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. व्यासपीठावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आदी उपस्थित होते. याव्ोळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थ्यांना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या कामांची माहिती दिली.

एका छताखाली २५ शासकीय विभागांचे माहितीचे स्टॉल

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या पाचोरा येथील कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे २५ हून अधिक स्टॉल उभारले होते. त्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळाल्यामुळे प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री तक्रार कक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आले. याव्ोळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता रोजगार मेळाव्यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रास्ताविक पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले.

वाहतूक मार्ग वळविला

मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी २६ ऑगस्टचा पाचोरा होणारा दौरा स्थगित झाला होता. त्यानंतर हा दौरा ९ सप्टेंबरला होईल, असे जाहीर झाले होते. मात्र, त्यातही पुन्हा बदल झाला होता. अखेर मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे अवजड वाहनांसाठी सकाळी सहापासून रात्री आठ वाजेपर्यंत पर्यायी वाहतूक मार्ग वळविण्यात आला होता. जळगावहून पाचोरामार्गे चाळीसगावकडे जाणारी अवजड वाहने ही पाचोरामार्गे न जाता जळगाव- एरंडोल-कासोदा-भडगावमार्गे चाळीसगावकडे आणि चाळीसगाव येथून पाचोरा मार्गे जळगावकडे जाणारी अवजड वाहने ही चाळीसगाव-भडगाव-कासोदा-एरंडोलमागेे जळगाव असा मार्ग वळविला होता. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली होती. यासंदर्भात माहिती न मिळाल्याने अनेक वाहनधारकांनी रोष व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here