साईमत न्यूज नेटवर्क –
देशाची राजधानी नवी दिल्लीतील गजबजलेल्या मालवीय नगर परिसरात आज सकाळी भीषण आग दुर्घटना घडून मोठी खळबळ उडाली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये अचानक लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २५ हून अधिक नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेस्टॉरंटमध्ये लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग काही मिनिटांतच पसरली आणि तिने रौद्ररूप धारण केले. धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी सुमारे ९.४५ वाजता अग्निशमन विभागाला कॉल प्राप्त झाला होता, तर आग अंदाजे ८.५० वाजता लागल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
बचाव पथकांनी रेस्टॉरंटच्या तळघरातून तीन जणांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. एकूण १० अग्निशमन गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी शोध व बचावकार्य अद्याप सुरूच आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा कारणास्तव परिसरातील शेजारील दुकाने आणि इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन करत आहेत.
