पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपात आरोग्य विभाग, मलेरिया विभाग आणि ‘बीव्हीजी’ची संयुक्त बैठक; ‘ऑन फिल्ड’ उतरण्याचे आदेश
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
पावसाळ्याच्या तोंडावर जळगाव शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होऊ नये आणि नाले-गटारी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. सोमवारी (८ जून) मनपामध्ये आरोग्य विभाग, मलेरिया विभाग आणि स्वच्छता कंत्राटदार ‘बिव्हिजी’ कंपनीची संयुक्त तातडीची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. “शहराच्या आरोग्याशी खेळणारा कोणीही असो, त्याची गय केली जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करा,” असे कडक आदेश महापौरांनी या बैठकीत दिले.
बैठकीत बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “नागरिक किंवा व्यावसायिक उघड्यावर कचरा टाकत असतील, तर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता थेट दंड आकारा. विशेषतः खाद्यपदार्थ विक्रेते आणि उसाचा रस विक्रेते उघड्यावर कचरा टाकत असल्याचे समोर आले आहे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. जेथे ‘कचरा टाकू नका’ असे फलक लावले आहेत, नेमका तिथेच कचरा टाकला जातो, हे चित्र आता जळगावात खपवून घेतले जाणार नाही.”
प्रतिबंधित प्लास्टिक विकल्यास दुकाने होणार ‘सील’
शहरातील नाले आणि गटारी तुंबण्यास प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याने महापौरांनी प्लास्टिक विरोधात थेट युद्ध पुकारले आहे. “ज्या ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकच्या थैल्या, प्लास्टिकचे ग्लास किंवा थर्माकोल विकले जाते, तिथे थेट धाडी टाका. वेळप्रसंगी दुकाने सील करण्याचे धाडस दाखवा. केवळ कारवाई न करता बायोडिग्रेडेबल आणि कापडी थैल्यांच्या वापराबाबत शहरात पुन्हा एकदा व्यापक जनजागृती करा,” अशा सूचना त्यांनी दिल्या.
’माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी महापौरांचे ‘प्लॅन ऑफ ॲक्शन’:
तात्काळ कचरा उचलणे: शहरात रस्ते झाडल्यानंतर तो कचरा रस्त्यावरच पडून न राहता तात्काळ उचलला गेला पाहिजे, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी.
घंटागाड्यांचे नियोजन: प्रत्येक वॉर्डात घंटागाड्यांचे शेड्युल व्यवस्थित आहे का? याची तपासणी करा. रोजच्या रोज प्रत्येक गल्लीतून कचरा उचलला गेलाच पाहिजे.
अधिकाऱ्यांनी ‘फिल्ड’वर उतरावे: पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरले किंवा नाले तुंबले, अशा जुन्या तक्रारी यापुढे ऐकून घेतल्या जाणार नाहीत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फक्त ऑफिसमध्ये एसीत न बसता ‘फिल्ड’वर उतरून काम करावे.
साथीच्या आजारांविरोधात मलेरिया विभाग अलर्टवर!
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी महापौरांनी मलेरिया विभागाचाही सविस्तर आढावा घेतला. शहरातील फॉगिंग मशीन, फवारणीची औषधे आणि इतर साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.
भ्रष्टाचार आणि दबावाविरुद्ध कडक इशारा
”आरोग्य विभागात चालणारा कोणताही गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, या विभागावर माझे बारीक लक्ष आहे,” असा थेट इशारा महापौरांनी दिला. जर कोणी कर्मचाऱ्यांना धमकावत असेल किंवा दबाब टाकत असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधा, असे सांगत कर्मचाऱ्यांनी कुठल्याही दबावाखाली न येता ‘बीव्हीजी’ आणि मनपाच्या आरोग्य विभागाने समन्वयाने जळगावच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रभारी आरोग्य अधीक्षक समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, मलेरिया विभागातील सुधीर सोनवाल, वीर दहीयेकर, रवींद्र निकम, तसेच ‘बिव्हिजी’ कंपनीचे अधिकारी विनोद रेड्डी, प्रशांत पवार, योगेश पाटील, श्रीकांत हंगे आदी उपस्थित होते.
