लोहारसह उपजमातींना अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरित लागू करा

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

‘कमार’ म्हणजेच लोहार (एस.टी.) जमातीची तस्सम जमात असणाऱ्या लोहार आणि तिच्या उपजमातींना अनुसूचित जमाती (एस.टी.) च्या सवलती त्वरित लागू करण्यात याव्या, अशा आशयाचे लेखी निवेदन समस्त लोहार समाजाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नुकतेच देण्यात आले.

लोहार व तिच्या तत्सम जमाती फारच मागासलेल्या आहे. अत्यंत निकृष्ट व हलाखीचे जीवन जगत आहे. त्यामुळे मध्यप्रांत व वऱ्हाड राज्यांचे १९४१ व १९५८ च्या आदेशानुसार लोहार जमातीला आदिम जमाती (एस.टी.)च्या सवलती लागू केलेल्या होत्या. पुढे विदर्भ प्रदेश १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला. त्यामध्ये लोहार जमात एस.टी.च्या यादीतून वगळण्यात आले. परंतु यादीमध्ये कमार जमातीचा उल्लेख क्रमांक २० वर केलेला आहे. ‘कमार’ म्हणजेच लोहार अशी नोंद समाजशास्त्रीय व मानवंश शास्त्रीय जुन्या दस्त एवजात नमूद असल्याने आढळून आलेले आहे.

केंद्र शासनाने १९७६ च्या अमेंटमेंटच्या आदेशामध्ये ‘कमार’ जमातीच्या तत्सम जमाती म्हणून महाराष्ट्रातील लोहार व तत्सम जमातीचा समावेश करुन पूर्वीचे एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत सुरु करावे व झालेला अन्याय त्वरित दूर करावा, अशी शासनाला २०२० पासून विनंती केली आहे. बराच पाठपुरावा केला आहे. परंतु शासनाने ही मागणी अद्यापही मंजूर केलेली नाही. निवेदन प्राप्त होताच त्वरित कार्यवाही करुन लोहार व तिच्या तत्सम उपजमातीस अनुसुचित जमातीची (एस.टी.) सवलत त्वरित लागू करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात नमूद केली आहे. अन्यथा महाराष्ट्रातून जमातीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

निवेदन देतेवेळी चेतन सन्नासे, ललित सपकाळे, अनिल लोहार, पुंडलिक सूर्यवंशी, पंढरीनाथ लोहार, पुंडलिक सूर्यवंशी, चेतन सनांसे, पंढरीनाथ चव्हाण, युवराज खैरे यांच्यासह इतर लोहार समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here