भल्या पहाटे अवैध रेती वाहणारे टॕक्टर व ट्रॉली दुर्घटनाग्रस्त; महसूलच्या गस्ती पथकाच्या पाठलागानंतर घडला प्रकार!!

0
3

साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी

 शहर व तालुक्यात सद्या अवैध वाळू वाहतुकीने जोर पकडला आहे. यावर अंकुश लागावा म्हणून रात्रभर महसूल प्रशासनाचे गस्ती पथक संपूर्ण तालुक्यात गस्त घालत असते. याचाच परिणाम म्हणून आज पहाटे पावणे सहा वाजता कारगील चौकातून शहरात प्रवेश करतांना एका अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॕक्टरचा पाठलाग करत असतांना वेगात असलेले ट्रॕक्टर ट्रॉलीसह महावीर नगर नजीक पलटी झाले. ही घटना इतकी भयंकर होती की, या मध्ये टॕक्टर व ट्रॉली यांची चाके निघून पडली होती. व ट्रॉलीमधील वाळू रस्त्यावर पसरली. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पथकातील तलाठी संतोष कोळी हे किरकोळ जखमी झाले. त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालयात नेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सदर घटनेची माहिती कळताच तहसीलदारांसह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. आता सदर ट्रॕक्टर चालक व मालकावर पुढे काय कारवाई होते? हि उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अवैध वाळू वाहतुकीस आळा बसण्याकरीता महसूल प्रशासनाचे पथक रात्री संपूर्ण तालुक्यात गस्त घालत असतांना शहरातील कारगील चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन दिसताच पथकाने त्याचा पाठलाग केला असता सदर विनाक्रमांकाचे वाहन अतिशय वेगात शहरातील यावल नाका ते कारगील चौक दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर माजी आमदार जगदीश वळवी यांच्या घराजवळ पहाटे साडे पाच ते पावणे सहा दरम्यान दुभाजकाला टक्कर देत रस्त्यावर पलटी झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांसह सर्व अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले.  घटनास्थळाचा पंचनामा करुन सदर वाहने जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने तहसील कार्यालयात नेण्यात आले. सदर घटना इतकी भयंकर होती की, यामध्ये ट्रॕक्टर व ट्रॉली टायर अक्षरशः वेगळे होवून पडले होते. घटना होताच वाहनचालक जागेवरुन पसार झाल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. सदर वाहन विनाक्रमांकाचे असल्यामुळे त्याच्या चेसीस नंबरवरुन वाहनमालकाची माहिती काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करणार असल्याचे तहसीलदार अनिल गावीत यांनी सांगितले.
सदर घटना घडताच वाळू माफीयांकडून ट्रॕक्टर व ट्रॉली जेसीबीद्वारे ओढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याठिकाणी महसूल प्रशासनाचे कर्मचारी पोहोचल्यामुळे त्यांचा तो डाव फसला असल्याचे बोलले जात आहे. सदर गस्ती पथकामध्ये प्रभारी नायब तहसीलदार रविंद्र माळी, तलाठी संतोष कोळी, सुधाकर महाजन, हमिद पठाण, गजानन पाटील आदि होते. तर घटनास्थळी तहसीलदार अनिल गावीत, चोपडा मंडळाधिकारी मनोज साळुंखे, शहर तलाठी किरण महाजन आदिंसह इतर कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here