कडक उन्हानंतर आल्हाद गारवा घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच आवडतो. पण येणाऱ्या पावसासोबत अनेक आजारही येतात. पावसाळ्यात दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या आजारांमुळे लोक त्रस्त होतात. या दिवसांत पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घेऊन निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. रोज उकळलेले पाणी पिणे, बाहेरचे किंवा उघड्यावरचे न खाणे हे नियम पावसाळ्यात पाळले पाहिजे. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच आणि पावसामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचता येते.
लसूण
लसणामध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच मेटाबॉलिज्मही वाढते. इतर पदार्थांमध्येही त्याचा समावेश करून सेवन करता येतो. सर्वांना परिचित आणि रोज जेवणात वापरला जाणारा लसूण हा महत्त्वपूर्ण आहे . कांद्यासोबत नेहमी लसणाचा उपयोग हा रोजच्या स्वयंपाकात होतो. तसेच याचा औषधीसाठीसुद्धा वापर केला जातो.
आले
पावसाळ्यात आल्याचे सेवन करणे खूप लाभदायक असते. आले घातलेल्या चहाचा स्वाद सगळ्यांनाच आवडतो. आल्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते. पावसाळ्यात आले खाणे तब्येतीसाठी चांगले मानले जाते. कच्चे आले हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने दररोज कच्चे आले खावे. आल्यामुळे सर्दीचा त्रास कमी होतो.
हळद
हळदीमध्ये ॲंटीसेप्टिक आणि ॲंटी-बायोटिक गुण असतात. पावसाळ्यात हळद घातलेले गरम दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे सर्दी, खोकला अशा अनेक आजारांपासून संरक्षण होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे. हळदीमधील करक्युमिन आणि व्हिटॅमिन-६ कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. ज्यामुळे तुमचे हृदय मजबूत आणि निरोगी राहते. पावसाळ्यात हळद घातलेले गरम दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
काळी मिरी
आहारात काळी मिरीचा समावेश करून त्याचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. काळी मिरीमुळे पदार्थाची चव तर सुधारतेच; पण ती निरोगी शरीरासाठी गरजेची आहे. काळी मिरी ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी अशा अनेक आजारात औषधी ठरते. काळी मिरीचे सेवन केल्याने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्याला खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो. घसादेखील स्वच्छ राहतो. इतकेच नव्हे तर बर्याच लोकांना सर्दीमुळे केस गळती होण्याची समस्या उद्भवते, यातही आपल्याला फायदा होतो. काळी मिरीचे सेवन केल्याने आपल्याला बर्याच प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो.
सफरचंद
रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांचा चेहराही बघावा लागत नाही, असं म्हणतात. विशेषत: पावसाळ्यात सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. सफरचंदात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरात लोहाच्या कमतरतेने होणाऱ्या रोगावर सफरचंद उत्तम उपाय ठरतो. रोज एक सफरचंद खाल्ल्याने रक्तातील लाल रक्त पेशींचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बीट
बीटमध्ये अनेक पोषकतत्त्वे आणि मिनरल्स असतात. बीट हे पोटॅशियम, फायबर आणि फॉलिक ॲसिडचा मोठा स्रोत आहे. मुख्य म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी आहे. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी तसेच फॉलिक ऍसिड असते. बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे. रक्त वाढते- लोह आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण अधिक असल्यामुळे बीटचा उपयोग रक्त वाढवण्यासाठी होऊ शकतो. रोज सकाळी एक कप बीटचा रस प्यावा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल आणि निरोगी राहायचे असेल तर वरती नमूद केलेले पदार्थ रोजच्या आहारात नक्की समाविष्ट करा.