राष्ट्रवादीने डावलल्यामुळे ज्येष्ठ नेते भुजबळ कमालीचे नाराज; राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील ‘अन्याया’वर बोट
”इतरांना जो न्याय मिळतो, तो मलाही मिळावा हीच अपेक्षा होती”; अजित पवार गटातील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर
“मी नाराज नाही, नाराज होऊन काय होणार? पण पक्षातील इतरांना जो न्याय मिळाला तोच न्याय मलासुद्धा मिळाला पाहिजे, ही माझी रास्त मागणी होती. शेवटी काय, ‘मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हू’…” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर आपली खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक असताना त्यांना डावलून प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू आणि पूर्व विदर्भातील नेते राजेंद्र जैन यांना पक्षाने उमेदवारी दिली. जैन यांनी सोमवारी विधिमंडळात आपला अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भुजबळांनी ‘बॅटिंग’ करत पक्षात आपल्यावर अन्याय होत असल्याचे सूचक संकेत दिले.
…तर भाजपवर खापर फोडणे चुकीचे!
भुजबळांना उमेदवारी नाकारण्यामागे भाजपचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणाले, “भाजपकडे माझा प्रस्ताव गेल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा एकच दिवस शिल्लक होता. त्यावर भाजपकडून असे उत्तर आले की, ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा याचा विचार करू. त्यामुळे भाजपने माझा प्रस्ताव नाकारला, या वृत्तात तथ्य नाही.”
”माझी मुलंबाळं कुठे मंत्री आहेत?” भुजबळांचा थेट टोला
आपली नाराजी व्यक्त करताना भुजबळांनी पक्षातील इतर नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला. “इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत, त्यांची मुलंबाळं मंत्री आहेत. मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा तोच न्याय मिळाला पाहिजे, हीच माझी मागणी होती,” असे म्हणत भुजबळांनी पक्षांतर्गत भेदभावावर बोट ठेवले. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, भुजबळांनी राज्यसभेवर जाताना स्वतःचे मंत्रीपद पुत्र समीर भुजबळ यांना देण्याची अट ठेवली होती, ज्याला वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल मिळाला नाही.
”आज नाही तर उद्या…” भुजबळांचा इशारा
पक्षात अन्याय झाला आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, “हे तर चालायचंच. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा… आम्ही बुद्धीबळाचे डावपेच खेळत नाही, आम्ही थेट भिडणारे कबड्डीचे खेळाडू आहोत.” भुजबळांच्या या विधानामुळे येत्या काळात अजित पवार गटात अंतर्गत वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
”भुजबळ साहेब वडिलांसारखे!” : राजेंद्र जैन
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्र जैन यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “छगन भुजबळ साहेब मला वडिलांसारखे आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहेत. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही आणि कोणताही सुप्त संघर्ष नाही,” अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली. राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक असून त्यांनी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत आमदार म्हणून काम पाहिले आहे.
