जळगाव, प्रतिनिधी : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मेहरूण तलाव परिसरातील रहिवासी फिर्यादी सौ. सुधा कावरा आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तेजल संचेती यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात घरकामासाठी येणाऱ्या ममताबाई धर्मराज धांडेकर (वय ४१) हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली.चौकशीत तिने आपल्या साथीदार धर्मराज हरिसिंग मीना (वय २८, रा. विदिशा, मध्यप्रदेश) याच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.
आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे :
२३.२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस – किंमत ₹३,०९,०००
१.६४ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातले – किंमत ₹११,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹४,००,०००
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने केली. या पथकात उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तसेच इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
