साईमत / वृत्तसंस्था
इंडोनेशियामध्ये एक भीषण हेलिकॉप्टर अपघात घडला असून यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या सुमारे २४ तास आधीच हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याचे दिसून येत आहे. जंगलात कोसळल्यानंतर प्रशासनाने तत्काळ बचाव आणि मदतकार्य हाती घेतले.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, बोर्नियो बेटावरील पाम तेलाच्या मळ्यांवरून उड्डाण करत असताना ही दुर्घटना घडली. रडार संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. संबंधित हेलिकॉप्टर एअरबस H130 मॉडेलचे असून ते पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा या कंपनीच्या मालकीचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हेलिकॉप्टर नेमके कुठे जात होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सीएनएन इंडोनेशियाच्या वृत्तानुसार, उड्डाणासाठी सुमारे ४५ मिनिटांची तयारी सुरू होती. उड्डाणाच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वैमानिकांनी काही काळ हेलिकॉप्टर हवेत नियंत्रित ठेवले, मात्र काही मिनिटांतच त्याचा रडारशी संपर्क तुटला आणि नंतर अपघात झाल्याची माहिती मिळाली.
सेकाडाऊ पोलीस विभागाचे निरीक्षक झैनल अबिदिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळ डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत आहेत. कठीण परिस्थितीतही बचाव पथकाने आठही मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. मृतांपैकी सात जण इंडोनेशियाचे नागरिक असून एक जण मलेशियाचा असल्याचे समोर आले आहे.
