साईमत न्यूज नेटवर्क –
वणी : सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. वणी–कळवण मार्गावरील अहिवंतवाडी शिवारात कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने पुलाचा कठडा तोडून थेट खाली नाल्यात कोसळले. या अपघातात पाच भाविक जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ केके १६९६ क्रमांकाची कार सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन वणीकडे येत होती. दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास अहिवंतवाडी परिसरातील पुलाजवळ वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारने पुलाचा कठडा भेदला आणि खाली नाल्यात जाऊन पडली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्घटनेत हर्षश्री आहेर (४२), देवदास आहेर (४७), पुष्कर आहेर (१७), गौरव आहेर (१३) आणि धोंडाबाई वाळुंज (६८), सर्व रा. निफाड हे जखमी झाले. काही जखमींच्या डोक्याला गंभीर मार लागला असून काहींना हात-पायांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी सर्व जखमींना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार वसंत साबळे करीत आहेत.
दरम्यान, नांदुरी–वणी मार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यालगत साईड पट्ट्यांचा अभाव, तसेच पुलांजवळ पुरेशा सुरक्षा उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अपघातप्रवण ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे, सूचना फलक आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
