वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना; १४ ऑगस्टपासून होते बेपत्ता
साईमत न्यूज नेटवर्क –
वाशिम : आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध झाल्याने नैराश्यात गेलेल्या प्रेमीयुगुलाने मोर्णा तलावात उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडली. महादेव गजानन (वय २४) आणि निकिता संतोष (वय २१) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघेही गोकसावंगी येथील रहिवासी होते. बुधवारी मासेमारीसाठी तलाव परिसरात गेलेल्या नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि निकिता यांचे काही काळापासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही विवाह करून आयुष्यभर एकत्र राहायचे होते. त्यांनी आपल्या विवाहाबाबत कुटुंबीयांना माहिती दिली होती. मात्र, दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्याने त्यांच्या विवाहाला कुटुंबीयांकडून विरोध करण्यात आला.
विवाहासाठी कुटुंबीयांनी संमती द्यावी, यासाठी दोघांनी अनेकवेळा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीय आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने दोघेही नैराश्यात गेले होते. अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
महादेव आणि निकिता हे दोघेही १४ ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मालेगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू असतानाच गावाजवळील मोर्णा तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले.
बुधवारी काही नागरिक मासेमारीसाठी मोर्णा तलाव परिसरात गेले असता त्यांना एकाच ठिकाणी दोघांचे मृतदेह दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
या घटनेमुळे गोकसावंगी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांकडून होणाऱ्या विरोधाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.
