साईमत न्यूज नेटवर्क –
पोलादपूर (रायगड) : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावाच्या हद्दीत हा दुर्दैवी अपघात घडला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या अपघातात सुवर्णा मार्कंडे आणि अनुश्री मार्कंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मार्कंडे आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अनिल मार्कंडे यांच्यावर नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, मुलगा चिन्मय मार्कंडे याच्यावर महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिल मार्कंडे हे दापोली कृषी विद्यापीठात कार्यरत असून मार्कंडे कुटुंब नगर येथून दापोलीकडे प्रवास करत होते. दरम्यान, लोहारमाळ परिसरात त्यांच्या कारला हा भीषण अपघात झाला.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. आई आणि मुलीचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी रायगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
