नागपूरहून लग्नासाठी निघालेले नांदे कुटुंब दुर्घटनेत उद्ध्वस्त; एक जखमी
साईमत / अमरावती
वरूड–मोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील खडका फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. समाधान नांदे, किरण नांदे आणि तीन वर्षीय दिया नांदे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, गोपाळ नांदे हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदे कुटुंबातील चौघेही नागपूर येथून लग्न समारंभासाठी निघाले होते. वरूड तालुक्यातील खडका फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. जखमी गोपाळ नांदे यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
