निमगव्हाणमध्ये १,७०० ब्रास अवैध वाळूचा प्रचंड साठा जप्त, माफियांमध्ये खळबळ
साईमत/चोपडा/ प्रतिनिधी :
चोपडा तालुक्यात अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल १,७०० ब्रास अवैध वाळूचा प्रचंड साठा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला या कारवाईमुळे निर्णायक वळण मिळाले असून वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
चोपडा तालुक्यातील निमगव्हाण गावात दादाजी धुनीवाले मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठवून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
क्षणाचाही विलंब न लावता चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आणि महसूल विभागालाही संयुक्त कारवाईसाठी सहभागी करून घेण्यात आले.
पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने निमगव्हाण येथे धाड टाकत अवाढव्य वाळू साठा ताब्यात घेतला. सध्या हा साठा जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, पुढील तपासही वेगाने सुरू करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेली १,७०० ब्रास वाळू ही जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कारवाईंपैकी एक मानली जात आहे. बाजारभावानुसार या वाळूची किंमत लाखोंच्या घरात जाते. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसायाला मोठा आघात बसला असून, पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या निर्णायक पावलांचे कौतुक केले आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायाविरोधात यापुढेही अशीच कठोर मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
