साईमत छ. संभाजीनगर प्रतिनिधी
जळगावातील एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यास औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. या मुलीचं वय अवघे पंधरा वर्ष असून तिचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ही मुलगी एका तरुणासोबत राजस्थानात सापडली. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या पोटात 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आले. तिच्या आईने उच्च न्यायालयात गर्भपाताची परवानगी मिळवण्साठी याचिका दाखल केली. पण खंडपीठाने यास स्पष्ट नकार दिला.
गर्भपात करण्यास परवानगी का नाकारली?
वैद्यकीय तपासामध्ये या मुलीच्या उदरात 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आलं. त्यानंतर तिच्या आईने जळगावमधील शासकीय रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यास परवानगी मिळावी अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. तेव्हा न्यायालयाने शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निर्देश देऊन या संदर्भात एक वैद्यकीय समिती गठित करण्यास सांगितले. तसेच त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले. तेव्हा वैद्यकीय तपासणीच्या अहवालात म्हटले की, ‘गर्भ 28 आठवड्यांचा आहे. गर्भपात केल्यास मुल जिवंत जन्माला येऊ शकते. मात्र पुरेसे विकसित न झाल्यामुळे त्यास निरीक्षणाखाली ठेवाव्ो लागेल. त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या मानसिकतेचा आणि आरोग्याचा देखील प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुलीचा गर्भपात करण्यास परवनागी दिली नाही.
अशी माहिती पीडित तरुणीच्या वकील ऋतुजा जाखडे यांनी दिली.खंडपीठाने गर्भपात करण्यास परवानगी नाकारल्याने तिच्या आईने तिला प्रसूती होईपर्यंत रुग्णालयात िंकवा एखाद्या आश्रमात ठेवण्याची विनंती केली. तेव्हा न्यायालयाने तिला नाशिकच्या शेल्टर होममध्ये िंकवा छत्रपती संभाजीनगर येथील शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बालकल्याण विभागाला त्या मुलीच्या आरोग्याची आणि तिच्या प्रसुतीची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रत सुरु असलेल्या मुलींच्या गायब होण्याच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.