सायकलवरून आरोग्याचा संदेश; भावी महापौर दीपमाला काळेंची पद्मालयवारी
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे यांची महापौरपदी निवड निश्चित झाली असून, अधिकृत घोषणेला आता केवळ औपचारिकतेचे स्वरूप उरले आहे. महायुतीच्या वतीने महापौर पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी दीपमाला काळे यांनी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह जळगाव ते पद्मालय असा सायकल प्रवास करत सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश दिला.
दीपमाला काळे या सायकलिंगच्या कट्टर चाहत्या असून फिटनेसबाबत त्या नेहमीच जागरूक असतात. महापौर पदासारखी मोठी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सायकलने पद्मालय गाठले. या सायकलवारीत जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण प्रवासात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
पद्मालय येथे गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर दीपमाला काळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या हितासाठी आणि जनसेवेची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी शक्ती व प्रेरणा मिळावी, असे साकडे गणरायाला घातले. यानंतर जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने त्यांच्या महापौरपदी निवड निश्चित झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच भावी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, महापौर पदासाठी महायुतीकडून केवळ दीपमाला काळे यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. या निवड प्रक्रियेची अधिकृत घोषणा येत्या ६ तारखेला होणार असून, जळगाव शहराला एक ‘फिट’, कार्यक्षम आणि जनहिताची जाणीव असलेली महापौर मिळणार असल्याची भावना सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
