महापालिका आणि हॉटेल चालकाचे नक्की ‘कनेक्शन’ काय?
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईचा बडगा उभारण्याचा दावा करणाऱ्या जळगाव शहर महानगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मेहरूण शिवारातील आकाशवाणी चौकातील सिटी सर्व्हे क्रमांक ३१९ मधील ‘लॅपिनोज पिझ्झा’ या व्यावसायिक आस्थापनेला विनापरवाना व वाढीव बांधकामाप्रकरणी १५ दिवसांची नोटीस बजावून तब्बल २० ते २१ दिवस उलटले, तरीही महापालिकेने अद्याप कोणतीही प्रत्यक्ष कारवाई केलेली नाही. त्यामुळे “मनपा प्रशासन फक्त नावालाच नोटिसा ठोकते का?” असा संतप्त सवाल जळगावकर नागरिक उपस्थित करत आहेत.
१५ दिवसांची मुदत संपली, मग कारवाई का थांबली?
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ अंतर्गत मनपा प्रशासनाने १७ जुलै रोजी लॅपिनोज पिझ्झाच्या चालकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. १५ दिवसांत अधिकृत कागदपत्रे व लेखी खुलासा सादर न केल्यास अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या खर्चाने पाडण्यात येईल, असा थेट इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला होता. मात्र, नोटीसची मुदत संपून आठवडा उलटला तरी संबंधित हॉटेलवर हातोडा पडलेला नाही.
नक्की काय आहे ‘कनेक्शन’? नागरिकांचे थेट सवाल
शहरात सर्वसामान्यांच्या लहान-सहान बांधकामांवर तात्काळ कारवाई करणारे मनपा अधिकारी या बड्या हॉटेलच्या बाबतीत मूग गिळून का बसले आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नोटीस दिल्यानंतर कारवाई थंडावण्यामागे मनपा अधिकारी आणि पिझ्झा शॉप चालकांमध्ये काही ‘खास कनेक्शन’ किंवा आर्थिक हितसंबंध दडले आहेत का? असा थेट संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
कारवाईची केवळ कागदी घोडेनाच?
दरवेळी शहरात अनधिकृत बांधकामांवर केवळ नोटिसांचे कागदी घोडे नाचवले जातात आणि पुढे हे प्रकरण बासनात गुंडाळले जाते, असा भूतकाळ आहे. ‘लॅपिनोज पिझ्झा’च्या बाबतीतही तोच प्रकार घडताना दिसत आहे. नियम सर्वांसाठी समान असताना व्यावसायिक आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम मनपाचे नगररचना व अतिक्रमण विभाग करत आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर महापालिका प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, की राजकीय दबावापोटी व छुप्या ‘कनेक्शन’मुळे ही नोटीस धूळ खात पडते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
