साईमत, प्रतिनिधी, जळगाव
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातील सामजंस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पुणे येथे बार्टीच्या कार्यालयात हा करार झाला. या करारान्वये बार्टीच्या अर्थसहायातुन अनुसूचित जातीच्या 50 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दिले जाईल.
त्यासाठी 63 लाख 10 हजार रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांच्या अशा दोन तुकड्या राहतील. याशिवाय अनुसूचित जातीच्या 150 विद्यार्थ्यांना बँकींग परीक्षांचे मार्गदर्शन दिले जावे, यासाठी 71 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यापीठात गेल्या काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या केंद्रात अनुसूचित जमातीच्या 25 विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाते.यासाठी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण, पुणे यांच्याकडून अर्थसहाय्य नियमितपणे दिले जाते. या सामजंस्य कराराप्रसंगी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, बार्टीच्या कुलसचिव इंदिरा अस्वार विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉ. अजय सुरवाडे उपस्थित होते.