जळगावला दिलासा: टँकर नाही, पाणी-वीज सेवा सुरळीत ठेवण्यावर भर
साईमत जळगाव प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या तीव्रतेत नागरिकांना पाणी व वीज या अत्यावश्यक सेवांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून अखंडित सेवा द्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
जिल्हा नियोजन सभागृहात पाणीटंचाई व महावितरणशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री उपस्थित होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पाणीपुरवठा योजनांच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने विशेष दक्षता घ्यावी. अत्यावश्यक परिस्थितीत वीज किंवा पाणीपुरवठा बंद करावा लागल्यास त्याची पूर्वसूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी ठासून सांगितले.
टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलजीवन मिशनअंतर्गत आलेल्या तक्रारींचे निराकरण संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन तात्काळ करावे, असे निर्देशही देण्यात आले. काही पाणीपुरवठा योजना वीज जोडणीअभावी रखडल्या असल्याचे निदर्शनास आणून देत त्या प्राधान्याने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधित मोटर कनेक्शन तात्काळ बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले.
नगरपालिका व नगरपंचायत स्तरावरील विकासकामांमध्ये अत्यल्प दराने घेतलेल्या निविदांमुळे कामांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे नमूद करून, दर्जा राखण्यावर विशेष भर देण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. जिल्ह्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, भुसावळ औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याच्या अडचणींमुळे उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावर महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केली. तसेच भुसावळमधील अमृत योजना टप्पा १ व २ ची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली.
जिल्ह्यातील पाणीस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत पर्जन्यमान समाधानकारक राहिले असून 2023 मध्ये 100 टक्के, 2024 मध्ये 110 टक्के तर 2025 मध्ये 113 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. सध्या हतनूर, गिरणा व वाघूर प्रकल्पांमध्ये मिळून सुमारे 47 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा एप्रिलपर्यंत एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही. केवळ 14 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बैठकीत आमदार, नगराध्यक्ष तसेच विविध लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा व वीजपुरवठा योजनांबाबतच्या समस्या मांडल्या. बैठकीच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
