अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मंत्र्यांकडून पाहणी शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची मागणी
साईमत /एरंडोल / प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी शेतकरी व नागरिकांच्या समस्या थेट मंत्र्यांसमोर मांडत तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
दि. ३० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान, घरांची पडझड, रस्ते व पुलांचे नुकसान तसेच पशुधनाची हानी झाल्याने नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील देवगाव, तामसवाडी आणि मुंदाणे प्र.उ. या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यात आली.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार ॲड. अमोलदादा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा देताना आमदार अमोलदादा पाटील यांनी शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली. अनेक भागांत शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेती पुन्हा उभी करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करून अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुरामुळे शेतीतील माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी प्रति एकर ५० हजार रुपयांचे विशेष अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती लक्षात घेता शेती, घरे, रस्ते, पूल आणि सार्वजनिक सुविधांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. पूरस्थितीमुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदारांच्या मागण्यांची दखल घेत मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे जलदगतीने पूर्ण करून नागरिकांपर्यंत शासनाची मदत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कोणताही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
