जिल्ह्यात १,१६८ ग्रामपंचायतींवर पोहोचले राज्य शासनाचे पाऊल
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासनात मोठा बदल घडवून आणत, राज्य शासनाने आठ नवीन ग्रामपंचायतींच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ११६० वरून ११६८ वर पोहोचली आहे.
ग्रामीण भागातील स्वतंत्र ग्रामपंचायतींवर वाढत्या मागणीमुळे आणि १५व्या वित्त आयोगाच्या थेट निधी व अधिकारांच्या वाढीमुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यापूर्वी किमान १ हजार लोकसंख्येचा निकष होता, परंतु आता तो ७०० पर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच, मूळ गाव आणि तांड्यांमधील ३ किमी अंतराची अट रद्द केल्यामुळे अनेक लहान वस्त्या व तांड्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेद्वारे शासनाकडे एकूण ४२ प्रस्ताव पाठवण्यात आले होते, त्यापैकी निकषात बसणाऱ्या ८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये चाळीसगाव तालुक्यातील ५, जामनेर तालुक्यातील २ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील १ ग्रामपंचायतचा समावेश आहे.
नव्या ग्रामपंचायतींच्या नावांत बोरखेडा ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन बोरखेडासीम, गोद्रीतून सुकानाईक तांडा, देऊळगाव गुजरीतून पळासखेडा काकर, वरखेडे बु. मधून दीपनगर, वलठाणमधून वलठाण तांडा, खेरडेमधून सोनगाव आणि कोंदगावमधून गणपूर या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ भाऊसाहेब अकलाडे यांच्या माहितीनुसार, या नवीन ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील तांड्यांचे विकास कार्य जलद गतीने पुढे जाणार असून, केंद्र आणि राज्य सरकारचा निधी थेट नवीन ग्रामपंचायतींमध्ये जमा होईल. यामुळे स्थानिक सरपंचांचे अधिकार वाढतील आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला मोठा चालना मिळणार आहे.
या बदलामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासन अधिक प्रभावी आणि स्थानिक समस्यांवर जलद प्रतिसाद देण्यास सक्षम होईल, तर नागरिकांसाठी विकासाचे नवे मार्ग उघडले जात आहेत.
