निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली

0
18

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

मुलींमध्ये आरोग्यविषयक जे बदल होतात, ते महिला, पालकांनी समजून घेणे आवश्‍यक आहे. तसेच आईने आपल्या मुलींशी मैत्रीण म्हणून भूमिका पार पाडावी. जेणेकरून मुली सर्व समस्या आईजवळ सहजतेने बोलतील. त्यातून मुलींच्या समस्या सोडविल्या जातील. यासोबत मुलींना सकस आहार द्यावा, शालेय विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे. त्यातच निरोगी आरोग्य सामावले आहे. निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन गोरगावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा साळुंखे-बोरसे यांनी केले.

त्या चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. सविता जाधव होत्या. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भूपेश सोनवणे उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. सविता जाधव यांनी उपस्थित महिला पालकांशी संवाद साधला. आपल्या मुलांवर परीक्षेचा ताण येणार नाही, यासाठी पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्याची जाणीव करून दिली. स्वतःची जाणीव होणे हे जीवन कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या अंतरंगात झोकून डोकावून स्वतःला ओळखले पाहिजे. निश्‍चितच जीवनात यशस्वी होता येईल. यावेळी दोन्ही वक्त्यांना महिलांसह पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्राचे वितरण डॉ. शिल्पा साळुंखे-बोरसे, प्रा डॉ. सविता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिका सुरेखा कोळी तर आभार बालवाडी विभागाच्या सुमती पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here