साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे श्री.गो.से.हायस्कुल येथील कलादालनात अमृत भारत स्टेशन योजनेमार्फत चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील कलागुण मांडता यावे, आपले स्टेशन कसे असावे, अमृत भारत योजना, अशा विविध विषयांवर चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. अशा नाविन्यपूर्ण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला वाघ होत्या.
स्पर्धेसाठी भुसावळच्या मुख्य कल्याण निरीक्षक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रमुख दीपा स्वामी यांनी विद्यार्थ्यांना योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले रेल्वे स्थानक कसे असावे, अमृत भारत योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाची जबाबदारी माझ्यावर असून पाचोरा शहरातील नागरिकांकडूनच सर्व गोष्टी आत्मसात करत आहे. त्यासाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपले मत व कल्पकता मांडायच्या आहे. रेल्वेच्या नूतनीकरणासाठी सर्वच घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.
यावेळी उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, कला शिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे, रुपेश पाटील, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र बोरसे तर आभार ज्येष्ठ शिक्षक रुपेश पाटील यांनी मानले.