गिरणा-मन्याड नदी जोड प्रकल्प झालाच पाहिजे

0
21

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ब्राह्मणशेवगे, हिरापूर, माळशेवगे, तळेगाव, हातगाव, अंधारी, रोहिणी, करजगाव, तळोंदा प्र.दे., शिरसगाव, पिंप्री प्र.दे.बु., डोणदिगर, देवळी, आडगाव आदी २२ गावातील शेतकरी गिरणा- मन्याड नदी जोड प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या गावांपैकी बऱ्याच गावांना सध्या पिण्यासाठी टँकर सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याने गुराढोरांचा प्रश्‍न आलाच तर शेतीपिकाला पाणी मिळणे तर कोसो दूर अशी परिस्थिती असल्याने अनेक गावच्या गाव पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत. तांडेच्या तांडे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाले आहेत. तीन-चार वर्षानंतर दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने गावांची पन्नास वर्षांपासून गिरणा- मन्याड नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे, अशी मागणी आहे.

गिरणा धरण हे गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आहे. मालेगाव शहर, चाळीसगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जिवंत पाण्याचा स्त्रोत आहे. मात्र, याच योजनांद्वारे जळगाव जिल्ह्याच्या जवळपास पाऊण भागातील लोकसंख्येची तहान भागते.बिगर सिंचनासाठी धरणाचे पाणी दहिगाव बंधाऱ्यापर्यंत प्रवास करते.पिण्यासाठी २ महिन्यातून एकदा पाणी सोडले जाते. मन्याड धरणाची निर्मिती १९७३-७४ मध्ये झाली आहे. गिरणा धरण हे मन्याड धरणापेक्षा २२ मिटर उंचीवर आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या पाणी मन्याड नदीजोड प्रकल्प झाल्यास येऊ शकते असा अहवाल गेल्यावर्षी जलसंपदा विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिला आहे.

पूर्वी मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नारळा, पारळा परिसरात पडणारे पावसाचे पाणी मन्याड धरणात येत होते. त्यामुळे धरण लवकर भरत होते. परंतु आता माणिकपुंज धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर ‘ओव्हर फ्लो’चे पाणी मन्याड धरणात आले तरच धरण भरते, अशी परिस्थिती आहे. परंतु गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. त्यामुळे धरण पूर्णपणे भरल्यानंतर जास्तीचे पाणी गिरणा नदीपात्रात सोडून दिले जाते. अशा परिस्थितीत जर मन्याड-गिरणा नदी जोड प्रकल्प झाल्यास गिरणा धरणातून अतिरिक्त गिरणा नदीत सोडण्यात येणारे पाणी मन्याड धरणात सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे मन्याड धरणावर अवलंबून असलेली २२ गावे सुजलाम्‌-सुफलाम्‌ होऊ शकतात. त्यामुळे मन्याड लाभक्षेत्रातील शेतकरी गिरणा-मन्याड नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे, अशी मागणी लाऊन धरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here