बालकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

0
1

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

बालकाचे अपहरण करून त्याच्या जीवाच्या मोबदल्यात ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींची खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा अपिलात रद्द करुन सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. हा खटला अमळनेर येथील सेशन कोर्टात चालला होता. ह्या निकालाविरुद्ध आरोपींनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

सविस्तर असे की, अमळनेर येथील डॉ. निखिल बहुगूणे यांचा सातवीतील मुलगा पार्थ याचे गेल्या ३ जानेवारी २०१७ रोजी ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अमळनेर येथील महेश विनायक खांजोळकर, सुनील विनायक बारी, भरत दशरथ महाजन, शुभम उर्फ शिवम गुलाब शिंगणे, अनिल नाना भील आणि भटू हिरामण खांजोळकर अशा सहा आरोपींनी अपहरण केल्याचा आरोप होता. घटनेनंतर १० जानेवारी २०१७ रोजी पोलिसांनी जळगाव एलसीबीच्या सहकार्याने सहा आरोपींना अटक केली होती. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन नायब तहसीलदार राजेश अमृतकर यांनी घेतलेल्या ओळख परेडमध्ये अपहृत बालक पार्थ याने सर्व सहाच्या सहा आरोपींना ओळखले होते. हा खटला अमळनेर येथील सेशन कोर्टात चालला होता.

खटल्याच्या चौकशीवेळी सरकार पक्षातर्फे फिर्यादी डॉ.निखिल बहुगूणे, नायब तहसीलदार राजेश अमृतकर, तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, अमळगाव येथून पार्थच्या आईवडिलांना फोन करणारे भगवान वारुळे, पंच यांच्यासह नऊ साक्षीदार तपासण्यात आले. चौकशीअंती न्यायालयाने सर्व आरोपींना भादंवि कलम ३६४-अ व १२०-ब या दोन कलमांखाली जन्मठेप आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. उर्वरित कलम ३६३, ३८५, ३८७, ३२३, ५०४ या कलमांतून आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. ह्या निकालाविरुद्ध आरोपींनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

अमळनेर येथील सेशन्स कोर्टात आरोपींच्या बचावाची बाजू मांडताना आरोपींचे वकील ॲड. वसंत आर.ढाके यांनी उपस्थित केलेले सर्व कायदेशीर मुद्दे व अमळनेर सेशन्स कोर्टात दाखल केलेला लेखी युक्तिवाद औरंगाबाद उच्च न्यायालयातील न्या.आर. जी. अवचट आणि न्या.नीरज पी. धोटे यांच्या खंडपीठाने ग्राह्य धरून सर्व सहा आरोपींची जन्मठेपेसह दंडाची शिक्षा रद्द करुन त्यांची निर्दोष मुक्तता केली. अमळनेर येथील सेशन्स कोर्टात आरोपींतर्फे बचावाचे काम करताना ॲड. वसंत आर.ढाके यांना ॲड. दिनेश पाटील, ॲड. शाम जाधव यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here