दैवी उपचाराच्या नावाखाली फसवणूक; संगमनेरमधील भोंदूबाबाला अटक
साईमत / संगमनेर
संगमनेर तालुक्यात “माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करतो” असे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील राजेंद्र बापू गडगे उर्फ भोंदू महाराज याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने “कॅन्सर बरा करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल होणे, घरगुती समस्या दूर करणे” असे दावे करत लोकांची दिशाभूल केली. यासाठी तो ११ हजार, २१ हजार आणि ५१ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळत असल्याचेही समोर आले आहे.
“दत्तधाम सरकार” नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू करून तो स्वतःचा प्रचार करत होता. त्यावरून तो अंधश्रद्धा पसरवत असल्याचे तसेच पैसे घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचे पुरावे पोलिसांना सादर करण्यात आले आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
