साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव येथील नवीन बस स्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोराने एका महिलेचे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील रहिवासी सुवर्णा अजय भोसले (वय ५२, रा. कळवा, जि. ठाणे) या खाजगी नोकरी करतात. त्या १८ जुलै रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास जळगाव येथील नवीन बसस्थानकावरून जळगाव ते चाळीसगाव प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने सुवर्णा भोसले यांच्या गळ्यातील आणि पर्समधील सोन्याचे दागिने अत्यंत चालाखीने लांबवले.
४५ हजारांचा मुद्देमाल लंपास
प्रवास सुरू झाल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे भोसले यांच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजात:
१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र
५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉंगलअसा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुवर्णा भोसले यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करत आहेत.
बसस्थानकांवर होणाऱ्या गर्दीत महिला प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रवास करताना किंवा बसमध्ये चढताना आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
