पाचोऱ्यात ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली लाखोंची फसवणूक

0
16

कोट्यावधींची माया जमवली, तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

दुचाकी, चार चाकी वाहनांचे व मोठ्या वस्तूंचे अामिष दाखवून ‘लकी ड्रॉ’ व बक्षिसांची भव्य सोडतच्या नावाखाली पाचोऱ्यात लाखो रुपयांची फसवणूक करीत कोणतीही बक्षीस किंवा वस्तू न देता आरोपींनी पोबारा केल्याची घटना पाचोरा येथील साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, ‘श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस’ च्या नावाखाली पत्रक छापून त्यावर रजिस्ट्रेशन नंबर टाकून दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठ्या वस्तूंची छायाचित्र छापून बक्षिसांची लयलूट म्हणून पंधराशे रूपयाच्या कुपनचे पत्रक छापले. त्यावर बक्षिसांची भव्यतम सोडत म्हणून पाचोरा शहरासह तालुक्यातील नागरिकांची पाच हजार ५५५ कुपन वितरित करून कोट्यावधींची माया जमा केली. २९ रोजी पाचोरा-वरखेडी रस्त्यावरील ‘साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स’ कार्यालयात भव्यतम सोडतचे आयोजन केले होते. याठिकाणी श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे संचालक अरुण आहेर, फरीद शेठ, आकाश पाटील, संजय पाटील, पुंडलिक कदम, मिलिंद संसारे, दिनेश व्यवहारे, ज्ञानेश्वर जेटे उपस्थित होते. मात्र, ‘लकी ड्रॉ’च्यावेळी उपस्थित नागरिकांना कोणत्याही प्रकारची बक्षीसे न देता लोकांचा जमाव पाहून तिथून पळ काढला. यावरून नागरिकांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक केली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर चिंतामण खैरनार (रा. शेवाळे, ता. पाचोरा)यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. तसेच किरण निंबा चौधरी (पाचोरा), संतोष मधुकर चंदने (रा. निंभोरी बुद्रुक, ता. पाचोरा), राजेंद्र सांडू पाटील (रा. लोहारी बुद्रुक, ता. पाचोरा) यांनीही यासंदर्भात पाचोरा पोलिसात तक्रार दिली आहे.

‘लकी ड्रॉ’ स्कीम चालविणारे संचालक बाहेर जिल्ह्यातील

याप्रकरणी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याशी संपर्क केला असता कोट्यावधीचे ‘लकी ड्रॉ’चा प्रकार साई मोक्ष रिसॉर्ट येथे झाल्याचे पोलिसांना कळाले होते. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून योग्य चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. दरम्यान, साई मोक्ष रिसॉर्ट याठिकाणी असा अवैध ‘लकी ड्रॉ’ला जागा कशी उपलब्ध करून दिली ? तसेच हा प्रकार घडला असताना पोलिसांनी संबंधितांना अटक का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘लकी ड्रॉ’ स्कीम चालविणारे संचालक बाहेर जिल्ह्यातील असल्याचे एजंटांनी सांगितले. त्यातील पुंडलिक सांडू कदम (रा.तिडका, ता.सोयगाव), स्नेहल दत्तात्रय नरोटे (रा. कोल्हार, ता.राहुरी, जि.नगर) आणि त्याचा भाऊ श्रेयस मराठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अवैध धंद्याचे रॅकेट धुळे जिल्ह्यात सुरू असल्याचेही एजंटांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here