आगामी विधानसभा मंत्री गिरीष महाजनांविरूध्द लढण्याची शक्यता
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे दिलीप खोडपे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच तुतारी हातात घेऊन रा.काँ.शरद पवार गटात प्रवेश करुन मंत्री गिरीष महाजन यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांना कुणाचेही आव्हान नसल्याचे चित्र होते. कारण काही महिन्यांपूर्वी महाजन यांचे कट्टर विरोधक तथा शेंदुर्णीचे रहिवासी संजय गरूड यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे महाजन यांचा एकतर्फी विजय होईल, असे सर्वांचे मत होते. मध्यंतरीच्या काळात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गिरीष महाजन यांना जामनेरातून पाडणार असल्याची गर्जना केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता गिरीष महाजन यांच्यासमोर मराठा समाजातील एक मोठे व्यक्तीमत्व उभे ठाकण्याचे संकेत मिळाले आहेत.
एस.पी.(शरद पवार) गटात सहभागी होणार
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तेच गिरीष महाजन यांना आव्हान देतील, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिलीप खोडपे हे शरद पवार गटात सहभागी होऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवतील, अशी राजकीय गोटात शक्यता वर्तविली जात आहे.
जिवाभावाच्या सहकारी, कार्यकर्त्यांचा मी आजन्म ऋणी असणार
गेल्या पाच वर्षांपासून माझ्याबाबतीत प्रचंड गैरसमज पसरवले गेले आणि हे गैरसमज आपल्याच पक्षातील सहकाऱ्याऱ्यांनी पसरवले, असे असूनही मी प्रामाणिकपणे व एकदिलाने पक्षाचे काम अविरतपणे सुरूच ठेवले. या सर्व गोष्टी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना माहीत असूनही मला पक्षात अपेक्षित सन्मान कधीही मिळाला नाही. माझ्याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरुच राहिल्या. म्हणजेच या गोष्टींना वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, असे दिसून येते. वेळोवेळी मी पक्षाच्या विविध कार्यक्रम, सभांमधून सर्व कार्यकर्त्यांसमोर पक्षात सुरू असलेली चमकोगिरी, प्रसिद्धीची हाव, कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष व पैशांना पक्षात आलेले महत्त्व अशा गोष्टींना उजाळा दिला. तरीही यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही. मागील अनेक वर्षांपासून मला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही. हा निर्णय घेताना मला किती वेदना होत असतील त्याची कदाचित आजचे कार्यकर्ते कल्पना करू शकणार नाही. कारण गेल्या ३५ वर्षातला संघर्ष आणि त्या संघर्षातून उभे केलेले संघटन सोडून जाणे खूप क्लेशदायक आहे. माझ्या प्रवासात मला एवढे मोठे करणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकारी, कार्यकर्त्यांचा मी आजन्म ऋणी असेल. जामनेर तालुक्यातील जनता, माझे सर्व जिवाभावाचे सहकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवेत हजर असेल. माझा कोणत्याही नेत्यावर अथवा पदाधिकाऱ्यांवर राग किंवा आकस नाही. परंतू, सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणूक, डावलने, मूळ विचार व ध्येयधोरणांपासून जामनेर तालुक्यात स्वतःच्या डोळ्यासमोर दूर जात असलेला पक्षाला कंटाळून, माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचे दिलीप खोडपे यांनी पक्षाला दिलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
पक्षश्रेष्ठी काय तो योग्य निर्णय घेतील
माझ्याकडे दिलीप खोडपे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यावर पक्षश्रेष्ठी काय तो योग्य निर्णय घेतील, असे भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले.