साईमत न्यूज नेटवर्क –
बालोतरा : कुटुंबीयांपासून पैसे लपवण्याची एका शेतकऱ्याला चांगलीच महागात पडली. जमीन विक्रीतून मिळालेले तब्बल पाच लाख रुपये चोरीला जाऊ नयेत म्हणून त्याने शेतात खड्डा खोदून पुरून ठेवले. मात्र, काही काळानंतर पैसे नेमके कुठे पुरले होते, हेच तो विसरून गेला. जवळपास वर्षभरानंतर पेरणीच्या कामादरम्यान नोटांनी भरलेली पिशवी सापडली; मात्र, तोपर्यंत वाळवीने नोटांचे अक्षरशः तुकडे केले होते. राजस्थानमधील बालोतरा येथे घडलेल्या या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
बालोतरातील मांगिलाल मेघवाल या शेतकऱ्याने जमीन विकल्यानंतर त्यातून मिळालेले पाच लाख रुपये घरात ठेवणे त्याला धोकादायक वाटले. चोरी होण्याची भीती तसेच पत्नीच्या हातून पैसे खर्च होऊ नयेत, या विचारातून त्याने रोकड शेतातील जमिनीत पुरून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतात खड्डा खोदून पाच लाख रुपये एका पिशवीत ठेवून त्यावर माती टाकण्यात आली.
मात्र, काही दिवसांनंतर मांगिलाल यांना आपण पैसे नेमक्या कोणत्या ठिकाणी पुरले, याचेच विस्मरण झाले. त्यांनी शेतात बराच शोध घेतला, परंतु पैसे काही केल्या सापडले नाहीत. अनेक दिवस प्रयत्न करूनही रोकड हाती न लागल्याने अखेर त्यांनी ही बाब पत्नी आणि मुलांना सांगितली.
सुरुवातीला कुटुंबीयांना मांगिलाल यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. मात्र, त्यांनी पैसे शेतात पुरल्याचे समजावून सांगितल्यानंतर पत्नी आणि मुलांनीही शेतात शोध सुरू केला. तरीही त्यांना पैसे सापडले नाहीत. त्यामुळे पाच लाख रुपये कायमचे गमावल्याचेच कुटुंबीयांना वाटत होते.
दरम्यान, जवळपास वर्षभरानंतर पावसाळ्यात शेतात पेरणीची तयारी सुरू असताना जमिनीत पुरलेली रोकड अचानक बाहेर आली. मांगिलाल यांच्या पत्नी आणि मुलाच्या हाती नोटांची पिशवी लागली. पिशवी उघडताच त्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे गठ्ठे दिसले. मात्र, पैसे सापडल्याचा आनंद काही क्षणांतच निराशेत बदलला.
जमिनीत दीर्घकाळ राहिल्याने वाळवीने नोटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अनेक नोटा अक्षरशः कुरतडल्या गेल्या असून, त्यांचे तुकडे झाले होते. त्यामुळे पाच लाख रुपयांच्या रोकडीचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
खराब झालेल्या नोटा बदलून मिळतील, या आशेने मांगिलाल यांच्या कुटुंबीयांनी त्या पचपदरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नेल्या. मात्र, नोटांची अवस्था पाहता बँकेने त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर बालोतरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतही कुटुंबीयांनी धाव घेतली; परंतु तेथेही खराब झालेल्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत.
चोरीच्या भीतीने कुटुंबीयांपासून पाच लाख रुपये लपवण्याचा मांगिलाल यांचा निर्णय अखेर त्यांच्याच अंगलट आला. पैसे सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात ते कुठे पुरले याचे विस्मरण झाले आणि वर्षभरानंतर सापडलेल्या रोकडीला वाळवीने फस्त केले. या प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला असून, मांगिलाल यांच्या निर्णयाची परिसरात चर्चा रंगली आहे.
