साईमत न्यूज नेटवर्क –
वसई : एकीकडे जगभरात फुटबॉल वर्ल्डकपचा उत्साह सुरू असताना, दुसरीकडे मुंबईलगतच्या वसईमध्ये फुटबॉल जगताला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुटबॉल क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याचे खोटे आमिष दाखवून एका ३६ वर्षीय खाजगी प्रशिक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन खेळाडूवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे.
अभिजित मेंडल (वय ३६, रा. वसई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वसई परिसरात स्वतःचे खाजगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवतो.
विश्वासाला तडा आणि ब्लॅकमेलिंगचा डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी २०२३ मध्ये फुटबॉलचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने आरोपी अभिजित मेंडल याच्या अकॅडमीमध्ये आली होती. तिचा खेळ पाहून आणि तिच्या महत्त्वाकांक्षेचा गैरफायदा घेत, आरोपीने तिला फुटबॉल विश्वात मोठ्या संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर, गेल्या तीन वर्षांत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
इतकेच नव्हे तर, अत्याचार करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओही आरोपीने काढून ठेवले होते. काही काळानंतर पीडित मुलीने त्याच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने ते आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा दबाव आणण्यास सुरुवात केली.
कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे नराधम गजाआड
या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने अखेर अत्यंत धैर्याने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी तातडीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती आरोपी अभिजित मेंडल याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी देणे तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो – POCSO) कायद्याच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, माणिकपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
