शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका पालकमंत्री गुलाबराव पाटील
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
खरीप हंगाम २०२६ सुरळीत आणि यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे, बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून तत्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच एकही शेतकरी बियाणे, खत किंवा पीककर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“१०० मिमी पावसानंतरच पेरणी करा”
यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये. किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कमी कालावधीतील वाण, आंतरपिक पद्धती आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी कृषी विभागाने गावागावांत जनजागृती मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
डीएपी खताची मागणी वाढत असल्याने एसएसपीसारख्या पर्यायी खतांच्या वापरावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर असून यंदा ४ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीपासाठी आवश्यक २२ लाख १० हजार कापूस बियाणे पाकिटांचा साठा उपलब्ध असून आतापर्यंत ४ लाख ५६ हजार ५३ पाकिटे उपलब्ध झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बोगस निविष्ठांविरोधात प्रशासनाचा दणका
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशारा देताना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले. अप्रमाणित खत विक्रीप्रकरणी दोन पोलीस गुन्हे दाखल करून ५.४७ मेट्रिक टन खतसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच चोपडा आणि एरंडोल येथे बनावट एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून तब्बल १० लाख २० हजार रुपये किमतीची ८५० पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
प्रत्येक तालुक्यात भरारी पथके नियुक्त करून बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कोणतीही तक्रार प्राप्त होताच तत्काळ कारवाई करून तक्रारींचे निरसन करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या.
अखंडित वीजपुरवठा आणि वेळेत पीककर्जावर भर
खरीप हंगामात शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बँका आणि वित्तीय संस्थांनी पीककर्ज वितरण वेळेत पूर्ण करावे. शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार बँकांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच शासन योजनांमधून मिळणारा लाभ थेट खात्यातून वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीच्या शेवटी “काम वेळेत करा, शेतकऱ्यांना फिरवू नका आणि निर्णय तात्काळ घ्या,” अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
रेशीम उद्योग आणि पाणी नियोजनावर भर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, असे सांगितले. मत्स्यउत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याबरोबरच यंदा पाऊस उशिरा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शेतकऱ्यांना तुती लागवडीकडे वळण्याचे आवाहन केले. तुती हे नगदी पीक असून त्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले. तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक तालुक्यांत दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
कृषी योजनांतून कोट्यवधींचा निधी
बैठकीत कृषी विभागाने तयार केलेल्या क्यूआर कोडयुक्त घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. यामध्ये कीटकनाशक फवारणीतील काळजी, बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन आणि खरीप हंगामासंदर्भातील उपयुक्त माहितीचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासनाच्या खरीपपूर्व तयारीचा आढावा सादर केला. जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी विविध कृषी योजनांची माहिती दिली.
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५७२४ अवजारांसाठी ३७ कोटी ९० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत २३ शेतकरी उत्पादन कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून २२७७ लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ८६ हजार ५१२ शेतकऱ्यांना ६४५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३१९ गावांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यासाठी ३ लाख ६५ हजार ८०० मेट्रिक टन खत आवंटित करण्यात आले असून सध्या १ लाख ६५ हजार ५५९ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
