साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर मंथन होणार आहे. यासह खान्देशी बोलीभाषा व खान्देशचे साहित्यिक वैभव या विषयांवर साहित्य रसिकांना मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या विषयालाही हात घालण्यात येणार आहे.
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहे. त्यात प्रामुख्याने राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय, तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान, स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान, आजच्या मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवत चालली आहेत का?, खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर), खान्देशी साहित्यिकांचे वैभव, याविषयांवर परिसंवाद होणार आहेत. याशिवाय ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत होणार आहे.
संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रताप महाविद्यालय परिसरात रंगरंगोटी, सुशोभिकरणासह जय्यत तयारी सुरु आहे. मंडप उभारणी, प्रवेशद्वारासह इतर कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सभामंडप क्र. १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात सुमारे सात ते दहा हजार प्रेक्षक बसतील, अशा जर्मन हँगर पद्धतीचा भव्य असा सभामंडप उभारण्यात येत आहे. सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात अंदाजे ५०० जणांच्या बैठकीची व्यवस्था केली आहे. सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहातही अंदाजे ५०० जणांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.