साईमत, यावल : प्रतिनिधी
येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी अशोक जामकर (भूमी अभिलेख यावल) होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, शाळा सदस्य शशिकांत फेगडे, दीपक महाजन, सारीका वाणी (पोलीस नाईक), पर्यवेक्षक म्हणून फैजपूर येथील नृत्यशिक्षिका शोभा लोधी, नितीन कोळी आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीत सादर करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांपासून इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक तसेच विविध प्रकारच्या वेशभूषा साकारल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी वेशभूषेला अनुसरून भाषणेही दिली.
काही विद्यार्थ्यांनी एकांकी नृत्य सादर करून कुशलतेने आपले कला कौशल्य सादर करुन प्रमुख पाहुण्यांसह सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. सर्वच विद्यार्थी स्पर्धेमुळे अत्यंत उत्साही तसेच आनंदित दिसून येते होते. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत फेगडे, सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मंजुषा साळुंखे, प्रवीणा पाचपांडे तर आभार अर्चना महाजन यांनी मानले.