शहीद सैनिकांचे कुटुंबीय भारावले

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील भारत विकास परिषदेच्या देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी या उपक्रमामुळे सैनिकांच्या कुटुंबियांसोबतच मान्यवर देखील भारावून गेले.
मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमास तहसीलदार विजय बनसोडे, माजी महापौर सीमा भोळे, माजी नौसेना अधिकारी हरीश यादव, रा.स्व.संघाचे महानगर संघचालक उज्वल चौधरी, क्षेत्रीय सचिव तुषार तोतला, अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी छाया वारुड, मीराबाई मनोरे, रत्‍नाबाई धनगर, ज्योती पाटील, प्रतिभा माळी, छायाबाई सोनवणे, सुरेखा देशमुख, रमेश पवार, भावना पाटील, सुनंदा पाटील, कविता जाधव या शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा श्रीफळ, साडी, दिवाळी फराळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सैनिकांच्या वीर माता व वीर पत्नीनी प्रमुख अतिथीसह भारत विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना चौरंगावर बसून भाऊबीज म्हणून औक्षण केले. भावाच्या ममतेने या मान्यवरांनी त्यांना ओवाळणी दिली. यावेळी संपूर्ण वातावरण भावस्पर्शी झाले होते.
प्रमुख अतिथी तहसीलदार विजय बनसोडे यांनी सैनिकांमुळेच आपण सुखाची दिवाळी करीत असतो.मात्र शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भारत विकास परिषदेने आठवण ठेवली, यामुळे त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. हा संपूर्ण कार्यक्रम रोमांचकारी आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. सैनिकांच्या घरात आर्थिक सुबत्ता नसते. शक्यतो सैनिकाच्या घरात सैन्यात जाण्याची परंपरा असते. मात्र राजकीय व्यक्तींचे मुले कधीही सैन्यात जात नाही. जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संपर्क आणि संवाद ठेवणे गरजेचे आहे. शासन व समाजाने देखील सैनिकांच्या कुटुंबीयांना सहकार्य केले पाहिजे,असे मत माजी नौसेना अधिकारी हरीश यादव यांनी व्यक्त केले.

सैनिकांच्या कुटुंबीयांमधून चिन्मयी पाटील, ज्योती पाटील,भावना पाटील, दिगंबर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या कार्याची माहिती अध्यक्ष महेश जडिये यांनी दिली. प्रास्ताविक तुषार तोतला यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here