भाजपा ‘सिकंदर’ ठरला असला तरी विजयामागे दडलीय्‌‍‍ पराभवाची किनार

0
49

देशातील पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल घोषित होऊन दहा दिवस उलटले आहेत.त्यामुळे विजयाचे ढोल आता थंडावले असून निकालाचे आत्मपरीक्षण सुरु झाले आहे.हे आत्मपरीक्षण केवळ पराभूत पक्ष करेल असे नाहीतर विजयी पक्षही ते करीत असतो.या निकालात भाजपाने तीन राज्यात विजयश्री खेचून आणली.मध्यप्रदेशात प्रचंड बहुमत प्राप्त करुन सत्ता कायम ठेवली तर राजस्थान व छत्तीसगडमधील चुरशीच्या लढाईत बहुमत मिळवण्यापर्यंत मजल गाठली.चौथे तेलंगणा राज्यात सत्तारुढ बीएसआरचा पराभव करीत काँग्रेसने देखील एकतर्फी विजय संपादन करुन एक राज्य आपल्या खात्यात जमा केले परंतु त्याच वेळी राजस्थान व छत्तीसगड ही दोन राज्ये गमावलीदेखील.

लोकशाहीत कोणी किती मते मिळवली त्याला फारसे महत्व दिले जात नाही तर कोणी बहुमताचा आकडा पार केला त्याला महत्व दिले जाते कारण सत्तेसाठी ते आवश्यक असते.भाजपाच्या विजयाला त्यामुळे राजकीय महत्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे.या विजयाचा भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष करणे साहजिक आहे,त्यात काहीही चुकीचे नाही मात्र तीन राज्यात विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींसह वरीष्ठ नेत्यांनी ज्या जोशात विरोधी काँग्रेसला टोमणे लगावले आणि प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ज्यापध्दतीने ढोल वाजवत ‘मोदी मोदी’ चा जल्लोष केला आणि ‘मोदी है तो गॅरंटी है’ ‘मोदी मॅजिक’ ‘मोदी का जादू चल गया’ अशा वल्गना करुन सेमीफायनल जिंकल्यानंतर आता लोकसभेची फायनलही आम्हीच जिंकणार,अशा आर्विभावात जनतेवर जो मनोवैज्ञानिक दबावतंत्राचा वापर करण्याचा खटाटोप चालवला आहे,तो कितपत समर्पक आहे,हा विचारमंथनाचा विषय ठरु शकतो व त्यासाठी या पाच राज्यातील मतदारांनी दिलेल्या कौलांवर बारकाईने एक नजर टाकली तर भाजपाशी टक्कर देणारा एकमेव विरोधीपक्ष काँग्रेंसच असल्याचे चित्र समोर आल्याशिवाय राहणार नाही.

मध्यप्रदेश : विजयाचे श्रेय कुणाला
प्रथम मध्यप्रदेशाचे उदाहरण घेऊ.या राज्यात भाजपाने १६४ जागा जिंकून एकतर्फी विजय संपादन केला आहे.भाजपाला ४८.७ टक्के मिळाली म्हणजेच २ कोटी ११ लाख १३ हजार २७८ मतदारांना ‘कमळ’ ला पसंती दिली तर काँग्रेसला केवळ ६५ जागा जिंकता आल्या.या पक्षाला ४०.५ टक्के मिळाली म्हणजेच १ कोटी ७५ लाख ६४ हजार ३५३ मतदारांनी ‘पंजा’ ला पसंती दिली.याचा अर्थ दोन्ही पक्षातील मतांमध्ये केवळ ८ टयांचा फरक आहे.त्यात काँग्रेसला ४९ जागा गमवाव्या लागल्या.आता भाजपाचे हे यश मोदींच्या चेहऱ्याचे की, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ‘लाडली बहन’या योजनेचे की,कांँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यातील टोकाच्या मतभेदांचे, हा संशोधनाचा विषय ठरेल.

राजस्थानातही कडवी झुंज
आता राजस्थानाच्या निकालावर बारकाईने नजर टाकली तर लक्षात येईल की, बहुमतासाठी आवश्यक होत्या १०१ जागा.भाजपाला अटीतटीच्या निवडणुकीत जागा मिळाल्या ११५ आणि काँग्रेसला जागा मिळाल्या ६९. भाजपाच्या पारड्यात मते पडली १कोटी ६५ लाख २३ हजार ५६८ मते तर काँग्रेसच्या पारड्यातही कमी नव्हेतर, तब्बल १ कोटी ५६ लाख ६६ हजार ७३१ मतांचे दान मतदारांनी टाकले आहे,हे विसरुन चालणार नाही.केवळ ८ लाख ५६ हजार ८३७ मते अधिक घेऊन भाजपाने अधिकच्या ४२ जागा खिशात घातल्या आहेत.दोन्ही पक्षातील मतांचे अंतर केवळ २ टक्के आहे.या राज्यातही अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद काँग्रेसच्या अपयशाला कारणीभूत ठरल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे भाजपाचे फावले हे जनतेला कळून चुकले आहे.

 

छत्तीसगडमध्ये काट्याची लढत
तिसरे राज्य छत्तीसगड.या राज्यातील मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुसंडी मारली त्यानंतर हळूहळू भाजपा व काँग्रेसमध्ये काट्याची लढत सुरु असल्याचे चित्र समोर येऊ लागले.सायंकाळी भाजपाने ८ ते १० जागांची आघाडी घेतली त्यामुळे कोणाची सत्ता येणार,याबाबत रात्रीपर्यंत प्रसारमाध्यमही संभ्रमात होती.रात्री पुन्हा एकदा हे अंतर कमी होऊन भाजपा व काँग्र्रेसमध्ये दोन जागांचे अंतर राहिले.त्यामुळे बाजी पलटते की काय,असे वाटत असतांनाच शेवटच्या टप्प्यातील काही जागांवर चुरशीची लढत होऊन अंतीम मतमोजणीत भाजपाने ५४ जागा जिंकून बहुमतापेक्षा ८ जागा पदरात पाडून सत्ता मिळवली.या राज्यातही भाजपा व काँग्रेसच्या मतांमधील अंतर केवळ ४ टक्के राहिले.भाजपाला ७२ लाख ३४ हजार ९६८ मते मिळाली तर काँग्रेसला ६६ लाख २ हजार ५८६ मतदारांनी मते मिळाली.हे अंतर केवळ ६ लाख ३२ हजार ३८२ मतांचे असून काँग्रेसला ३५ जागा मिळाल्या आणि ३३ जागा गमवाव्या लागल्या.सुमारे २० ते २२ जागांवर काट्याची टक्कर झाली आणि या जागांवरील विजयाचे अंतर केवळ ५०० ते १००० इतके राहिले.एकंदरीत तिन्ही राज्यातील निकालाचा परामर्ष घेतला तर मध्यप्रदेशातील भाजपाचा विजय हा एकतर्फी राहिला आहे तर राजस्थान व छत्तीसगड या दोन राज्यातील विजय हा जय-पराजयाच्या शर्यतीतील आहे.त्यात भाजपाची सत्ता मध्यप्रदेशात होतीच.त्यात राजस्थान व छत्तीसगडची भर पडली आहे.कोणतीही निवडणुक म्हटली की,कोणा एका पक्षाचा विजय होणार आणि दुसऱ्या पक्षाचा पराभव,हे ठरलेले असते.

 

तेलंगणात कॉग्रेसची मुसंडी
आता चौथे राज्य तेलंगणावरही एक नजर टाकू या.या राज्यात के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षापासून भारत राष्ट्र समिती (बीएसआर) चे सरकार होते.त्यांनी अलिकडेच देशभरात पक्ष वाढीची मोहिम सुरु केली होती व महाराष्ट्रात काही भागात शिरकावही केला होता.या राज्यात ११९ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसने ६४ जागा जिंकत, स्पष्ट बहुमत प्राप्त करीत सत्ता काबीज केली.या राज्यात काँग्रेसने जवळजवळ ३९ टक्के मिळवत ६४ जागांवर कब्जा केला तर बीआरएसने ३७ टक्के मते मिळवली मात्र त्या पक्षाला ३९ जागांवर समाधान मानावेे लागले.या राज्यातही दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांमधील अंतर केवळ दोन टक्के राहिले.भाजपानेही या राज्यात कसून जोर लावला.या राज्यातही पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहांसह भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी जाहीर सभा व रॅली करुन मतदारांना आकर्षित करण्यात कोणतीही कमी ठेवली नाही.तरीही या राज्यात भाजपाची डाळ काही सिजल्याचे दिसत नाही.भाजपाला १४ टक्के मतांपर्यत मजल मारता आली आणि ८ जागा पदरात पाडून घेता आल्या.तसं पाहिलं तर भाजपा हा सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष,त्यात मोदी व शहांसह सर्व मंत्र्यांनी जीवाचे रान केले तरी तेलंगणात या पक्षाला तिसऱ्या स्थानावर राहण्याची वेळ आली.अर्थात भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली हे निश्चित पण या राज्यातील बीएसआर व भाजपाच्या दारुण पराभवाबद्दल आणि काँग्रेसने राज्य स्थापनेनंतर पहिल्यांदा सरकार आणले,याबद्दल कोणीही फारशी दखल घेतलेली दिसत नाही.

 

सत्य चित्र नेमकं काय
तीन राज्यातील भाजपाच्या विजयाबद्दलचे ढोल जोरात बडवण्यात आले व ते अपेक्षीत होते पण निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार त्याचे विश्लेषण करण्याच्या फांद्यात फारसे कोणी पडल्याचे दिसत नाही.कोणाला आवडो अथवा न आवडो, तो अल्पसा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.जे सत्य चित्र आहे,ते जनता दरबारात जसेच्या तसे मांडण्याचा हा खटाटोप.भाजपा नेतृत्व फार चलाख आहे.निवडणुकांमध्ये विजय झाला तर मोदींमुळे आणि पराभव झाला की,त्याची जबाबदारी त्या राज्यातील स्थानिक नेत्यांवर किंवा राष्ट्रीय अध्यक्षांवर टाकली जाते.कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभा तसेच रॅलीव्दारा राज्य पिंजून काढले होते.हिमाचल प्रदेशातही तेच झाले.काँग्रेसने बहुमत मिळवत भाजपाकडून सत्ता काबीज केली.विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे याच प्रदेशाचे.त्यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता पण त्यावेळी भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी सोयीस्करपणे चुप्पी साधली.भाजपा २०१४ च्या विजयानंतर ते आजपर्यंत देश कांँग्रेसमुक्त करण्याची घोषणा करीत आहे मात्र ते प्रत्यक्षात घडतांना दिसत नाही.कांँग्रेसने राजस्थान व छत्तीसगड ही दोन राज्ये गमावली असली तरी याच वर्षात कर्नाटक व हिमाचल प्रदेश ही राज्ये भाजपाकडून हिसकावून घेतली आहे हे विसरुन चालणार नाही.आता काँग्रेसने तेलंगणातही सत्ता आणली आहे.याचाच अर्थ काँग्रेसचा आलेख हळूहळू उंचावत आहे,हे राजकीय निरीक्षक मान्य करु लागले आहेत.

थोडक्यात सांगायचे म्हणजे, पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. ‘जो जिता वही सिकंदर’ या म्हणीनुसार भाजपाला या विजयाचे श्रेय द्यावेच लागेल तसेच काँग्रेसलाही तेलंगणातील विजयाबद्दल शाबासकी द्यावी लागेल.२०२४ च्या लोकसभेची सेमी फायनल भाजपाने जिंकली आहे मात्र सेमी फायनल जिंकणारा फायनल जिंकतोच असेही नाही, हे सुत्र मोदींच्याच गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेेतील अंतिम सामन्याने स्पष्ट केले आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फायनल जिंकण्याची गॅरंटी दिली आहे.जो तो आपल्या सोयीनुसार पाचही राज्यांमधल्या जय-पराजयाचे विश्लेषण करत आहे. मिझोरम विधानसभा निवडणुकीचाही निकाल लागला आहे.तिथे पाच वर्षापुर्वी लार्डऊहोमा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या झोरम पिपल्स मुव्हमेंट या पक्षाने सत्ता मिळवली आहे.ते काँग्रेसचे माजी खासदार आहेत.त्यामुळे या राज्यात काँग्रेसच्या मतात विभागणी होऊन पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागल्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशाचे किंवा जगाचे नेते म्हणून ज्यांचा जयघोष सुरु आहे ते पंतप्रधान मोदी तेलंगणाप्रमाणे मिझोरामही जंगजंग पछाडून जिंकू शकलेले नाही.देशात सर्वत्र ‘मोदी मॅजिक’ चालत नाही,हे २०२३ मध्ये कर्नाटक,हिमाचल प्रदेश,तेलंगणा आणि मिझोरमच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे.काँग्रेस हा पक्षच आपला खरा प्रतिस्पर्धी आहे आणि त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसची प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत चालली आहे तसेच आपल्या तीन राज्यातील निकालापैकी मध्यप्रदेश वगळता राजस्थान व छत्तीसगडमधील विजयातही पराभवाची किनार दडली आहे,हे मोदींसह सर्व भाजपा नेत्यांनाही निकालांवरुन उमजू लागले आहे,त्यामुळेच त्यांनी विधानसभा निवडणुकी जिंकण्यासाठी थेट काही केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांनाही मैदानात उतरवले पण मनातील ही धास्ती बोलून न दाखवता,पक्ष कार्यकर्त्यांना घरोघरी जावून विविध जनकल्याण योजनांची माहिती देण्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे,हे कशाचे संकेत आहे, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

 

दोन जिंकली,दोन राज्ये गमावली
भाजपा नेतृत्व फार चलाख आहे.निवडणुकांमध्ये विजय झाला तर मोदींमुळे आणि पराभव झाला की,त्याची जबाबदारी त्या राज्यातील स्थानिक नेत्यांवर किंवा राष्ट्रीय अध्यक्षांवर टाकली जाते.कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभा तसेच रॅलीव्दारा राज्य पिंजून काढले होते.हिमाचल प्रदेशातही तेच झाले.काँग्रेसने बहुमत मिळवत भाजपाकडून सत्ता काबीज केली.विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे याच प्रदेशाचे.त्यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता पण त्यावेळी भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी सोयीस्करपणे चुप्पी साधली.भाजपा २०१४ पासून देश काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा करीत आहे मात्र ते प्रत्यक्षात घडतांना दिसत नाही.काँग्रेसने राजस्थान व छत्तीसगड ही दोन राज्ये गमावली असली तरी याच वर्षात कर्नाटक व हिमाचल प्रदेश ही राज्ये भाजपाकडून हिसकावून घेतली आहे आणि तेलंगणा हे नविन राज्य आपल्या खात्यात जमा केले आहे,हे भाजपाने विजयाचा जल्लोष करताना विसरुन चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here