जामनेर तालुक्यातील मोहाडी गावावर शोककळा; विवाहानंतर अवघ्या २० दिवसांत काळाने हिरावले संसाराचे स्वप्न
साईमत/जामनेर/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाने अक्षरशः कहर केला असून, तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भीषण उकाड्याच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विवाहानंतर अवघ्या २० दिवसांतच एका २० वर्षीय नवविवाहितेचा उष्माघात सदृश आजाराने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाचोरा तालुक्यातील बाळद येथील वैशाली भिल (वय २०) हिचा विवाह २३ एप्रिल रोजी मोहाडी येथील सुनील भिल याच्याशी मोठ्या आनंदात पार पडला होता. वैशाली दोन्ही पायांनी दिव्यांग होती, तर तिचा पती सुनील याला बोलताना अडथळा येत होता. मात्र, शारीरिक अडचणींवर मात करत एकमेकांचा आधार बनून संसार उभा करण्याचे स्वप्न दोघांनी पाहिले होते. नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच नियतीने या संसारावर काळाचा घाला घातला.
बुधवारी सकाळपासूनच वैशालीला तीव्र उष्णतेमुळे अस्वस्थ वाटू लागले. उलट्या होणे, चक्कर येणे असे त्रास सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला सायंकाळी नेरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला तत्काळ जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, उपचारासाठी जळगावला नेत असतानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार उष्माघाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
वैशालीच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांत कुटुंबावर आलेला हा दुसरा मोठा आघात आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचा चक्कर येऊन मृत्यू झाला होता. घरातील मोठी मुलगी असलेली वैशाली कुटुंबाची आधारवड मानली जात होती. वडिलांच्या निधनानंतर तिचे लग्न करून जबाबदारी पूर्ण झाल्याचे समाधान कुटुंबीयांना वाटत असतानाच नियतीने पुन्हा एकदा घाव घातला.
वैशालीच्या पश्चात तिची आई, चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार असून, तिच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
