आंबेडकर नगर भागातील नुकसानग्रस्त भरपाई मिळण्यापासून वंचित
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील जुन्या जळगावातील रथ चौकामधील कोल्हे वाड्याजवळील आंबेडकर नगर भागात गेल्या ४ जून २०२४ रोजी पावसामुळे परिसरातील वृक्ष उन्मळून घरांवर पडले होते. त्यात घरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. यासंदर्भात नुकसानग्रस्त झालेल्यांनी संबंधित नगरसेवक, आ.सुरेश भोळे तसेच नवनिर्वाचित खा.स्मिता वाघ यांच्याकडे तोंडी स्वरुपात तक्रारी करुन नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, सहा महिन्याचा काळ उलटूनही अद्याप कुठलीही नुकसान भरपाई नुकसानग्रस्तांना मिळालेली नाही. त्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिले आहे. यासाठी नुकसानग्रस्तांना न्याय देवून नुकसान भरपाई त्वरित मिळावी, अशी रास्त मागणी नुकसानग्रस्त झालेल्या महिलांनी दै. ‘साईमत’कडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
नुकसानग्रस्तांपैकी वर्षा रोहीदास सावळे यांनी दिलेल्या लेखी अर्जात नमूद केले आहे की, माझे घर जुन्या जळगावातील रथ चौकामधील कोल्हे वाड्याजवळील आंबेडकर नगर भागात आहे. गेल्या ४ जून २०२४ रोजी या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे वृक्ष उन्मळून घरावर पडले होते. त्यात घरांचे नुकसान होऊन गृहोपयोगी संसाराच्या वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात अनेकवेळा आ.सुरेशमामा भोळे यांच्या संपर्क कार्यालयात लेखी अर्जही दिला होता. त्यानंतर त्यांनीही पाहणी केली नाही. तसेच मदतही केली नाही. दुसरीकडे कोणतीही दखल घेतली नाही. त्यावेळी जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून आलेल्या स्मिताताई वाघ यांच्याशीही संपर्क साधला होता. त्यांचेही निवडणुकांमुळे दुर्लक्ष होते. मात्र, आतातरी नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
संबंधित विभागानेही लक्ष देण्याची गरज
आंबेडकर नगर भागात घरावरील पडलेल्या वृक्षांची तोडणी करुन ते कुणाच्या परवानगीने नेली? असाही प्रश्न तेथे प्रत्यक्ष पाहणी केल्यावर उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित विभागानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील सहा नुकसानग्रस्तांचे घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सर्वांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी लेखी अर्जात नमूद केली आहे. लेखी अर्जावर वर्षा रोहिदास सावळे यांच्यासह विमल अशोक भालेराव, संगीता भारत सोनवणे, शुभांगी मनोज भालेराव, वंदना गोविंद सोनवणे, विमल कडू सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.