साईमत लाईव्ह कळंब प्रतिनिधी:- अजित चव्हाण
कळंब:- मराठा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा एकदा मराठवाड्याच्या भूमीतूनच सुरु झाला आहे. कळंब येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. ओबीसी कोट्यातून न्याय्य आरक्षण द्यावे या मागणीसाठी साधारण एक लाख मराठा बांधव, भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले.
कळंब येथील विद्या भवन हायस्कूलचे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा मोर्चाचा प्रवास झाला. आजपर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी झुलवत ठेवले आहे. समाज हक्काच्या आरक्षणासाठी लढा सुरूच आहे, मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला सैवेधानिक आरक्षण द्यावे, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करुन त्यातून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे, राज्यातील सर्व मराठा मुलामुलींची वसतीगृहे सुरु करावीत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात घोषणा न देता केवळ आरक्षण समर्थनाच्या तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणा दिल्या जात आहेत. या मोर्चात सर्व पक्षीय मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या. जागोजागी मोठा पोलिस बंदोबस्त होते.