साईमत / मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज खराब हवामानाचा मोठा फटका बसल्याची घटना घडली आहे. महालक्ष्मी येथून साताऱ्यातील दरे या गावी जात असताना, कल्याण आणि मुरबाड परिसरात अचानक आलेल्या वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टरचे नियंत्रण बिघडले.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पीए आणि ओएसडी यांच्यासह हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे रवाना झाले होते. मात्र, कल्याण–मुरबाड परिसरात हवामानात अचानक बदल झाल्याने हेलिकॉप्टर हवेतच अडकले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने मोठ्या कौशल्याने आणि प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवले. त्यानंतर जुहू विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या प्रसंगामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
या घटनेची माहिती समजताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
