रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. तो कायम ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा निवडणूक लढवेल. ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावेल. पण प्रश्न हा आहे की, भाजपा रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देईल का? रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देणं भाजपासाठी रिस्क असेल. कारण रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे आहेत. आज जरी दाखवले जात असेल की, खडसे सासरा आणि सून यांच्यात राजकीय मतभेद आहेत. पण तसे उघड चित्रं अजून कुठेही दिसले नाही. समजा भाजपाने रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली तरी त्यांना निवडून आणण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी ही एकनाथ खडसे यांच्यावर येऊन पडणार आहे. म्हणजे जे बारामती मतदारसंघात अजित पवारांबाबत घडेल, तेच रावेरमध्ये घडू शकते. त्यामुळे खडसे यांच्यावर जयंत पाटील यांनी शिवधनुष्य उचलण्याची जबाबदारी टाकली असली तरी नातीगोती सांभाळण्याची देखील खडसे यांच्यावर दुसरी जबाबदारी येऊन पडणार आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढत होण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. याउलट भाजपाने जर रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राहू शकतील. रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्विकारली तर मात्र, एकनाथराव खडसे रावेर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचे शिवधनुष्य उचलतील, हे मात्र तेवढेच खरे.
देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तापायला लागले आहे. भाजपा एनडीए आघाडी जशी कामाला लागली, तेवढीच ताकद इंडिया आघाडीने लावली आहे. त्यामुळे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्रं बहुतांशी वेगळे राहील, हे सांगायला कोणत्याही राजकीय विश्लेषकाची आवश्यकता नाही. निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक असल्यामुळे भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदार संघाची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात देखील तेच सुरू आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अनेक मतदार संघाचे चित्रं बदलणार आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदार संघात बारामती, ठाणे आणि जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघाचा समावेश होतो . बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे निवडून येतात. पवार कुटुंबियांचा तो बालेकिल्ला आहे. पण आता ह्या कुटुंबातच फुट पडल्यामुळे अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, हे महत्वाचे ठरणार आहे. जरी अजित पवार हे भाजपसोबत गेले असतील, पण ते सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी आपली ताकद पणाला लावतील का? अजित पवार यांना राजकीय दृष्ट्या आज जे वलय प्राप्त झाले आहे. त्यात निश्चितच शरद पवारांचा आशिर्वाद मोठा आहे, हे संपुर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यानंतरही अजित पवार आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न करतील का? तर अजिबात नाही. राजकारणात अनेक तडजोडी होतात. तशीच काहीशी तडजोड अजित पवार करणार नाही का? तर त्यांना ती करावी लागेल. भले उघडपणे नाही, पण राजकारणात जिंकून आणण्यासाठी जसे प्रयत्न होतात, तसे ते उमेदवार उभे करून पाडण्यासाठी देखील होतात. तसेच काहीसे प्रयत्न बारामती मतदारसंघात झाले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. बारामतीनंतर चर्चेत असलेला मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भले नातीगोतींच्या जंजाळात अडकलेला नाही. पण निष्ठावंत शिवसैनिक आणि ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेल्यांची मात्र इथे गोची होणार आहे. ऐन निवडणुकीत काहीही चित्रं या मतदारसंघात पहायला मिळू शकते, असे बोलले जात आहे.
अशीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाची झाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या खासदार रक्षा खडसे आहेत. रक्षा खडसे या पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार एकनाथराव खडसे यांच्या सूनबाई आहेत. खडसे राष्ट्रवादीत गेले असतील, पण सूनबाई भाजपात आहेत. पक्षनिष्ठा म्हणुन त्यांनी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका देखील केली आहे. रक्षा खडसे यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडून आणण्यात त्यांचे सासरे म्हणजे एकनाथ खडसे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. रक्षा खडसेच काय या मतदारसंघातून गेल्या पंचवीस वर्षात जेवढे खासदार झाले आहेत. त्यात खडसे यांचे योगदान आहेच. पण खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यानंतर आता रक्षा खडसे यांचे राजकीय भवितव्य काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. खडसे आणि भाजपातील स्थानिक तसेच राज्यपातळीवरील नेत्यांमध्ये प्रचंड वैमनस्य झाले आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांना भाजपा पुन्हा उमेदवारी देईल का? अशी शंका उपस्थित केली जात होती. गेल्या काही दिवसांपासुन ही चर्चा रंगत असताना, त्यात आता शरद पवार यांची जळगावात सभा झाल्यानंतर नवीन ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट म्हणजे शरद पवार यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून आवाहन केले की, रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवधनुष्य एकनाथराव खडसे यांनी उचलावे. जयंत पाटील यांनी आवाहन केल्यानंतर आता एकनाथ खडसे रावेर लोकसभा मतदारसंघात स्वतः लोकसभेची उमेदवारी करतील का? असा प्रश्न उपस्थित होणं आणि त्यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आली, आणि ते म्हणाले पक्षाने आदेश दिला तर मी अवश्य निवडणूक लढणार. मग सुरू झाली सासरे विरुद्ध सून रावेर लोकसभा मतदारसंघात लढत रंगण्याची चर्चा. मुळात रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. तो कायम ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा निवडणूक लढवेल. ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावेल. पण प्रश्न हा आहे की, भाजपा रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देईल का? रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देणं भाजपासाठी रिस्क असेल. कारण रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे आहेत. आज जरी दाखवले जात असेल की, खडसे सासरा आणि सून यांच्यात राजकीय मतभेद आहेत. पण तसे उघड चित्रं अजून कुठेही दिसले नाही. समजा भाजपाने रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली तरी त्यांना निवडून आणण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी ही एकनाथ खडसे यांच्यावर येऊन पडणार आहे. म्हणजे जे बारामती मतदारसंघात अजित पवारांबाबत घडेल, तेच रावेरमध्ये घडू शकते. त्यामुळे खडसे यांच्यावर जयंत पाटील यांनी शिवधनुष्य उचलण्याची जबाबदारी टाकली असली तरी नातीगोती सांभाळण्याची देखील खडसे यांच्यावर दुसरी जबाबदारी येऊन पडणार आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढत होण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. याउलट भाजपाने जर रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राहू शकतील. रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्विकारली तर मात्र, एकनाथराव खडसे रावेर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचे शिवधनुष्य उचलतील, हे मात्र तेवढेच खरे.
– त्र्यंबक कापडे, कार्यकारी संपादक, जळगाव