भरधाव आयशरने दिली धडक, पित्यासमोरच बालिकेचा करुण अंत 

0
2

पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

तालुक्यातील पहूर येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्रीला शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने पितापुत्री गंभीर जखमी झाले. त्यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून संतप्त ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्तारोको करून रस्ता रोखून धरला. रस्त्याचे काम ८ दिवसात पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले होते.
ज्ञानेश्वरी शंकर भामेरे (वय ११, रा. पहूर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील शंकर भामेरे हे पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहेत. ज्ञानेश्वरी ही आई, वडील, भाऊ, बहीण, आजोबा, काका यांच्यासह राहत होती. ज्ञानेश्वरी ही डॉ. हेडगेवार विद्यालयात शिकत होती. शंकर भामरे हे आपल्या सायकलने मुलगी ज्ञानेश्वरीला पहूर बसस्टॅन्डवर घेऊन येत होते. पहूर बसस्टँड जवळ असणाऱ्या नाल्याजवळ बांधकाम सुरु आहे. तेथे कच्च्या रस्त्यावर जात असताना मागून येणारी भरधाव आयशर (क्रमांक एम. एच. २३ ऐ.यु ८५८२) ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात शंकर भामरे व त्यांची कन्या ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले.
पाचवीत शिकणाऱ्या ज्ञानेश्वरी भामरे व तिच्या पित्याला नागरिकांनी पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वरीला मयत घोषित केले. शंकर भामेरे हे जखमी झाले आहेत. मयत ज्ञानेश्वरी ही शुक्रवारी जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कवी संमेलनाला जात होती. तिला सोडण्यासाठी वडील शंकर भामरे येत असतानाच आयशरने धडक दिल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला. शंकर भामरे हे विज्ञान प्रदर्शनासाठी जात होते. शवविच्छेदन करून दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आयशर चालक सुनील ज्ञानदेव सोनवणे (रा. अंजनवटी, ता. जिल्हा बीड) यास पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
दरम्यान, अपघातामुळे पहूर परिसरातून प्रचंड संतापाची लाट उसळली. सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या वाघूर नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येणाऱ्या- जाणाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. याठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहेत. रस्त्याचे काम त्वरित व्हावे, यासाठी पहूर येथील माजी जि.प सदस्य राजधर पांढरे, माजी जि.प कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, महेश पाटील, आदींनी संतप्त भावना व्यक्त करून रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी केली. तर, रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here