साईमत न्यूज नेटवर्क –
कल्याण : कल्याणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले असून या प्रकरणात एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ दोन संशयित व्यक्तींच्या हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान कासिम अब्दुल सत्तार वसईकर आणि कृष्णा नागप्पा हळेमणी यांच्या ताब्यातून ९ किलो २३६ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे ३२ कोटी ३२ लाख रुपये इतकी असल्याचे समोर आले. तसेच आरोपींकडून ३९ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
यानंतर अधिक तपासात कासिम वसईकर यांच्या घराची झडती घेतली असता आणखी ५३१ ग्रॅम हेरॉईन मिळाले. पुढील चौकशीत या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद युसुफ पठाण असल्याचे उघड झाले. तो कल्याण आणि नाशिक परिसरात ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
तसेच गणेशन पुथुस्वामी जंगमार, सद्दाम गफुर शेख आणि इतर आरोपींचाही या नेटवर्कमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी टप्प्याटप्प्याने कारवाई करत ५ एप्रिल, ६ एप्रिल आणि २१ मे रोजी विविध आरोपींना अटक केली.
या संपूर्ण कारवाईत एकूण ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ३४ कोटी १८ लाख रुपये इतकी आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी अमजद पठाण याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे.
