उन्हाळ्यात मोठा दिलासा धरणगावातील ११ गावांना पिण्याचे पाणी
साईमत/धरणगाव/ प्रतिनिधी :
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. धरणगाव तालुक्यातील ११ गावांसाठी अंजनी धरणातून उद्या, १५ मे २०२६ रोजी पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात येणार असून, या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात पाण्यासाठी होणारी नागरिकांची वणवण थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली करत हे आवर्तन मंजूर केले आहे.
निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी अंजनी धरणातून सुमारे १५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. हे पाणी पिंप्रीमार्गे सोनवदपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
या आवर्तनामुळे धरणगाव तालुक्यातील कल्याण (खु.), वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु., हणमंतखेडे खु., पिंप्री खु., कल्याणेहोळ, भोद खु., हिंगोणे खु. आणि सतखेडा या ११ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी आणि कमी झालेला पाणीसाठा पाहता हे आवर्तन ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोटारपंप वापरू नयेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. तसेच नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत सांगितले की, उन्हाची तीव्रता वाढत असून ग्रामीण भागातील पाणीस्थिती गंभीर झाली आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून हे आवर्तन सोडण्यात आले असून, प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. पाण्याचा अपव्यय टाळला नाही तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.या निर्णयामुळे धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना तात्पुरता दिलासा मिळाला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
