साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपीय वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती आठवले यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले. त्यानंतर ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत म्हटले गेले. नंतर करुणा क्लब व शाळेच्या सांस्कृतिक मंडळातर्फे देशभक्तीपर गीत म्हटले गेले. त्यानंतर तालुकास्तरीय बुद्धीबळ, कॅरम व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार केल्यानंतर शाळेतून रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीला शाळेतून सुरुवात होऊन डॉ.बाविस्कर यांच्या घराजवळून, डॉ.मुठे यांच्या हॉस्पिटल जवळून महाराणा प्रताप चौक, विजय मारोती मंदिर, बस स्टँड मार्गे तिरंगा चौकात आली. तिथे नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन पंचप्राण शपथ घेतली. त्यानंतर आठवडे बाजारातून पुन्हा शाळेत आले. रॅलीत शालेय दोन्ही सत्राच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा दिलेल्या घोषणांनी अमळनेर शहर दणाणून निघाले. रॅलीचे क्रीडा शिक्षक जे.व्ही. बाविस्कर, श्रीमती आर.एस. सोनवणे यांनी संचालन केले. याबद्दल शाळेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार
अमळनेर नगर परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी आस्मा पिंजारी, योगिता पाटील यांचा तिरंगा चौकात माजी आमदार शिरीष चौधरी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सत्कार केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, कला शिक्षक एस.एस.माळी, डी.एन.पालवे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले.