डॉ. प्रवीण गेडाम नाशिकचे नवे विभागीय आयुक्त

0
21
डॉ. प्रवीण गेडाम नाशिकचे नवे विभागीय आयुक्त-www.saimatlive.com

साईमत प्रतिनिधी (विवेक ठाकरे)

राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पुण्याहून नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर कृषी विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबत आदेश काढला असून, डॉ. प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार घ्यावा, असे म्हटले आहे.

डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. डॉ. प्रवीण गेडाम यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत नाशिक मनपा आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे नाशिक हे त्यांना चांगले परिचित आहे. शिवाय, त्यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळे त्यादृष्टीने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी अशीही चर्चा आहे.

तसेच राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच, डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना राज्याचे कृषी आय़ुक्त आणि आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान,अवघ्या सहा महिन्यात राज्याच्या कृषि आयुक्त पदावरून डॉ.गेडाम यांची नाशिकला झालेली बदली आणि त्यापूर्वी सुद्धा सुनील चव्हाण यांची कृषि आयुक्त पदावरून तडकाफडकी मंत्रालयात अवर सचिव म्हणून झालेली बदली याबाबत मात्र चर्चा आहे.डॉ.गेडाम यांच्या जागी नवीन कृषि आयुक्त यांची नियुक्ती झालेली नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे व खताच्या बाबतीत अडचणीचे ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here