साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हा पुनर्गठन कार्यक्रमातंर्गत माध्यमिक शिक्षक पतपेढी, जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील नवनियुक्त तालुकाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीत जळगाव जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रियेत डॉ. कुणाल पवार यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कुणाल पवार हे अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत ढेकू खुर्द येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उर्वरित जिल्हा कार्यकारिणी विस्तार पुढील जिल्हा कार्यकारिणी बैठकीत लवकरच करण्यात येणार आहे. जिल्हा निवड प्रक्रिया राज्य निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले राहुल पवार, नंदुरबार यांच्या आणि संघटनेचे राज्यसंघटक संजय सोनार, राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चौथे यांच्या उपस्थित पार पडली.
बैठकीत जळगाव जिल्हा महिला कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्षपदी श्रीमती पल्लवी गरुड यांची निवड करण्यात आली. महिला जिल्हा सरचिटणीस म्हणून सुनिता निलेश पाटील, महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीमती ज्योत्स्ना शिरसाट-केदारे, श्रीमती माधवी वाघ-गरुड या दोघांची तर महिला जिल्हा कोषाध्यक्षपदी श्रीमती प्रेमलता पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा कौतिक धनगर, कुलश्री गणेश गवळी, श्रीमती शुभांगी महालपुरे-चिंचोले तसेच महिला जिल्हा आरोग्य विभाग प्रमुखपदी श्रीमती तुळसा दुधे, महिला जिल्हा सल्लागारपदी ॲड.मनीषा संदीप देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व्यासपीठावर राज्य निरीक्षक राहुल पवार, संजय सोनार, विनायक चौथे, माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्ष यांचा यावेळी विशेष सत्कार जिल्हा व राज्य कार्यकारिणीच्यावतीने करण्यात आला. यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी संघटनेच्यावतीने जुनी पेंशन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. येणाऱ्या १ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘पेंशन शंखनाद रॅली’त अधिकाधिक संख्येने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार यांनी केले आहे. सूत्रसंचालन माजी जिल्हा सल्लागार नाना पाटील तर आभार सचिन देशमुख यांनी मानले.