यावल साईमत प्रतिनिधी
शहरातील प्रत्येक प्रभागात,वार्डात,गल्ली बोळात गणपती बाप्पाचे आगमन झाले. मात्र शहराच्या मुख्य मार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डेच, खड्डे झाले आहेत. खोल खड्डे आणि उंचच उंच गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. दुरुस्ती न झाल्यामुळे बाप्पाचे स्वागत खाचखळग्यातुनच करावे लागले आहे. दरम्यान, यावल नगरपालिकेचे स्थापत्य अभियंता योगेश मदने आणि मुख्याधिकारी हेमंत निकम हे मात्र मुख्यालयाच्या बाहेर असल्यामुळे वेळेत दुरुस्तीचे कोणतेच काम झाले नाही. त्यामुळे यावल शहरातील गणेश भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी तथा यावल नगरपरिषद प्रशासक कैलास कडलग यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी, अशी अपेक्षा गणेश भक्तांनी व्यक्त केली आहे.
यावल पोलीस स्टेशन आवारात आणि धनश्री चित्र मंदिरात या पंधरा-वीस दिवसात दोन वेळा शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सण,उत्सव साजरे करताना येणाऱ्या अडीअडचणी समस्या याबाबत चर्चा झाली. पहिल्या बैठकीत वीज वितरण कंपनी,यावल नगरपरिषद तसेच इतर काही विभागाचे जबाबदार कर्मचारी गैरहजर होते त्याबाबतची कार्यवाही देखील गुलदस्त्यात आहे.
यावल शहरात बुरुज चौकापासून बारी चौकापर्यंत, बारी चौक पासून तर तलाठी कार्यालयापर्यंत,तलाठी कार्यालयापासून पंचवटीकडे जाणारा मार्ग,बडगुजर गल्लीत चाळीस ते पन्नास फूट अंतर खोल (जुना ‘पेव’ असलेला खड्डा )मोठा खड्डा, बाल संस्कार विद्या मंदिरापासून आयडीबीआय बँक पर्यंतचा रस्ता एका ठिकाणी गटारी कडे खचल्यामुळे त्या ठिकाणाहून गणेश आगमनाची मिरवणूक येण्यास आणि त्यानंतर गणेश विसर्जन करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
सार्वजनिक वाचनालय जवळ नादुरुस्त झालेला रस्ता तसेच मेन रोडवरील बेहेडे यांच्या शॉप पासून गवत बाजार आणि बोरावल गेट पर्यंत,म्हसोबा देवस्थानाजवळ नादुरुस्त रस्ता यावल नगरपालिकेने गणेश उत्सवात दुरुस्त न केल्यामुळे तसेच काही गणेश मंडळांनी श्री गणेशाची मूर्ती वाजत गाजत वाहनांवर आणली असता शहरातील दोन ठिकाणच्या मुर्त्या क्रॅक झाल्याचे बोलले जात आहे. यावल शहरातील गणेश बाप्पाच्या आगमनाची ही वस्तुस्थिती आहे आणि आता चार दिवसानंतर गणेश विसर्जन मिरवणूक काळात देखील पुन्हा त्याच अडचणी समोर येणार आहेत.
यावल नगरपरिषद बांधकाम विभाग अंतर्गत झालेली निकृष्ट प्रतीची कामे लक्षात घेता तसेच इतर दैनंदिन कामकाजात सुद्धा बांधकाम विभाग निष्क्रिय ठरल्याने,कर्तव्यात कसूर केल्यामुळे प्रांताधिकारी तथा यावल नगरपरिषद प्रशासक कैलास कडलग यांनी यावल नगर परिषद बांधकाम विभागाचा गेल्या तीन वर्षापासूनचा लेखी अहवाल तयार करून यावल नगर परिषद तत्कालीन आणि विद्यमान प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई होण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगाव नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडे पाठवावा अशी मागणी यावल करांकडून व्यक्त होत आहे.
यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने गेल्या शनिवारपासून मुख्यालयाच्या बाहेर आहेत ते मुख्याध्याच्या बाहेर कोणत्या कारणाने आहेत याची माहिती मुख्याधिकारी हेमंत निकम यांना आहे किंवा नाही तसेच शासकीय कारणास्तव बाहेर असल्यास ऐन गणेश उत्सवात पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. ती पर्यायी व्यवस्था प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी का केली नाही..? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.
लेखी तक्रारी नंतरही
कारवाई नाही
यावल शहरात पडलेल्या खड्डयांबाबत लेखी तक्रार गेल्या दोन महिन्यापासून केलेली आहे. तसेच विकसित कॉलनीत मुख्य रस्त्यावर बोगस पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा हे बोलके पुरावे दिसत असून देखील यावल नगरपालिका प्रशासन निर्लज्ज आणि निष्क्रीय वागत आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी, सदस्य देखील जाब विचारायला तयार नाही. त्यामुळे नाराजी वाढत चालली आहे.