शिष्टमंडळातर्फे पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी :
सद्यस्थितीला गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. सध्या त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी नदीत वाया न घालवता ते शेतीसाठी पाटात सोडावे, अशी मागणी उबाठा शिवसेना शहर व तालुका शाखेने केली आहे. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने धरणगाव पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दिले आहे. यावेळी शिवसेना उपनेते, रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले आहे. निवेदनात, गिरणा धरणातून वाहणारे पाणी दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे थेट अमळनेर तालुक्यातील शेवटच्या चारीपर्यंत सोडण्यात यावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये पाणी पाझरून पातळी वाढण्यास फायदा होईल, अशी मागणी केली आहे.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख हेमंत महाजन, युवा सेना शहर प्रमुख लक्ष्मण महाजन, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, तालुका समन्वयक संतोष सोनवणे, लीलाधर पाटील, रणजित सिंग शिखरवार, रमेश चव्हाण, सतीश बोरसे, किरण अग्निहोत्री, जगदीश मराठे, प्रेमराज चौधरी, जिभाऊ पाटील तसेच प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन यांच्यासह शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.